अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  यंदाच्या वर्षी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार हे नक्की. कारण राज्य सरकारी कर्मचार्‍यांना व इतर पात्र कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

1 जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. महागाई भत्ता आता 17 टक्क्यांवरुन 28 टक्के इतका झाला आहे.

नुकतेच राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे महागाई भत्त्यातील वाढ जाहीर केली. 1 जुलै 2021 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला.

वाढीमध्ये 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासुनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्याचा दर 17 टक्के इतकाचा राहील.

सदर महागाई भत्ता वाढ 1 ऑक्टोबर 2021 पासून रोखीने देण्यात येणार आहे. 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या 3 महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्र्यपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.