Ahmednagar News:सतत लागून राहिलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. कांदा, सोयाबीन पिकांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

प्रशासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नगर तालुक्यातील ११९ गावांपैकी ९७ गावे पावसामुळे बाधित झाले असून महसूल, कृषी व ग्रामपंचायत यांच्या वतीने संयुक्तिकरित्या पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनामे पुर्ण करण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

परतीचा पाऊस चित्रा नक्षत्रात सलग लागून राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रोजच पाऊस पडत आहे. तालुक्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असुन जेऊर पट्ट्यात तर ढगफुटी सदृश्य पावसाने दररोज सीना, नदीला पूर येत आहे.

खोसपुरी, पांगरमल, उदरमल, सोकेवाडी, मजले चिंचोली या भागात गुरुवार व शुक्रवारी सलग दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिस्थिती फारच बिकट बनली आहे.

तालुक्यातील सर्वच तलाव, बंधारे तुडुंब भरलेले आहेत. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सारोळा कासार येथील पुर्वा नदी, अकोळनेर येथील वाळूंबा नदी, चिचोंडी पाटील येथील केळ नदी, जेऊर येथील सीना ओसंडून वाहत आहेत.

तालुक्यातील सर्वच तलाव ओव्हरफ्लो झाले असून सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे. सततच्या पावसाने सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून कांदा, सोयाबीन व कांद्याच्या रोपांची पार वाताहात झाली आहे.

नगर तालुका गेल्या दशकापासून कांद्याचे पठार म्हणुन ओळख निर्माण करत आहे. कांदा पीक व कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांदा उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तुरळक प्रमाणात बाजरी तसेच मका, भाजीपाला, नवीन पेरण्यात आलेली ज्वारी, नव्याने लागवड करण्यात आलेल्या फळबागा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

ज्वारीची दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सर्वच पिकांनी पाणी साचले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिराहून घेतला आहे.