अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  मीठाशिवाय संपूर्ण जेवणच रुचकर व चविष्ट लागत नाही. त्यामुळे लोक जेवणात जास्तीत जास्त मीठाचा वापर करतात.

पण तुम्हाला माहित आहे का, की जास्त मीठ खाणे ही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डब्ल्यूएचओने (WHO) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, दरवर्षी बरेच लोक जास्त मीठ खाल्ल्यामुळे मरतात.

डब्ल्यूएचओच्या (WHO) मते,आपण जे मीठ वापरतो त्यात सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते तर पोटॅशियमचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे लोकांना रक्तदाबाचा त्रास होतो.

यासोबतच हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो, त्याचवेळी हाडेही कमकुवत होतात. WHO च्या मते, बहुतेक लोक दररोज 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात, जे आरोग्याच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे.

म्हणूनच लोकांच्या अन्नातून मीठ कमी करण्यासाठी WHO ने एक संस्था स्थापन केली आहे, ज्या अंतर्गत संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी 2025 पर्यंत मीठाचा वापर निम्मा करण्याचा निर्णय घेतला आहे.

WHO च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लोकांनी दिवसातून फक्त 5 ग्रॅम मीठ खावे. त्याच वेळी, हार्वर्ड मेडिकल जर्नलनुसार, आपण वापरत असलेल्या मीठामध्ये 40 टक्के सोडियम आणि 60 टक्के क्लोराईड असते.

आपल्या शरीराला या सोडियमची फक्त 500 मिलीग्राम गरज असते. जास्त सोडियम आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. भारतातील लोक देखील अमेरिकन लोकांपेक्षा जास्त मीठ खातात.

जास्त मीठ खाण्याचे तोटे

१. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. याशिवाय उच्च रक्तदाबाच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते.

२. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

३. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, जास्त मीठ खाल्ल्याने वजनही झपाट्याने वाढू शकते.

४. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाणही कमी होऊ लागते. ज्यामुळे तुम्ही अल्सर, ऑस्टिओपोरोसिसचे शिकार होऊ शकता.

दररोज किती प्रमाणात मिठाचे सेवन करावे डब्ल्यूएचओच्या मते, दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.