Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोरनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना मिळत असलेले वाढते महत्व हे एक आहे.

त्यामुळे शिवसेनेकडून वेगळा विचार सुरू झाला की काय, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये बदल केला असून तेथून मंत्री असल्याचा उल्लेख हटविला आहे.

ठाकरे यांच्या या कृतीचे आता वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले आहेत. शिंदे यांची समजूत काढून त्यांना परत आणण्यासाठी शिवसेनेला काही तरी करावे लागणार आहे. त्याचा फटका आदित्य ठाकरे यांना बसणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

त्यामुळे आज सकाळी अनेकांनी आदित्य ठाकरे यांचे हे बदलले प्रोफाईल पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, ठाकरे यांनी पूर्वी मंत्री असल्याचा उल्लेख तेथे केलेला होता का? असाही प्रश्न काही जणांकडून उपस्थित केला जात आहे.

शिंदे यांची समजूत काढण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शिवसेनेला दोन पावले मागे यावे लागेल. त्यामुळे ही तयारी सुरू असून वेळ पडली तर अंदाज घेऊन तसे निर्णय घेतले जाऊ शकतात, असेही सांगण्यात येत आहे.