यंदाच्या लोकसभा निवडणुकांत भाजपने काही धाडसी निर्णय घेतले. महायुतीतील भाजप-शिंदेसेनेने लोकसभेचे एकूण १२ विद्यमान सदस्य नाकारले आहेत. म्हणजेच जवळपास १२ खासदार घरी बसवले आहेत.
आता त्यांच्या पुनर्वसनाचे पॉवरफुल प्लॅनिंग भाजपासह महायुतीमधील घटक पक्ष करत आहेत. प्रत्यक्षात तिकीट नाकारलेल्यांची संख्या व पुनर्वसनाची संधी यात फार तफावत असल्याने काहीजणांचे पुनर्वसन होईल की नाही यात शंका आहे.
महायुतीने नाकारलेले खासदार
पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, संजय धोत्रे, राजेंद्र गावित, उन्मेष पाटील, प्रीतम मुंडे, जयसिद्धेश्वर स्वामी, कृपाल तुमाने, भावना गवळी, हेमंत पाटील, गजानन कीर्तिकर
कसे केले जाऊ शकते पुनर्वसन ?
राज्यसभेच्या तीन जागा भरण्याचे चान्सेस आहेत. यात जर पियुष गोयल लोकसभेला निवडून आले तर ती जागा रिक्त होईल व ती भाजपलाच मिळेल यात शंका नाही. अन्य दोन जागांवर अजित पवार गटाचा आतापासूनच दावा आहे.
कारण त्यांना जागा कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे शिंदेसेनेने संधी नाकारलेले भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), कृपाल तुमाने (रामटेक), राजेंद्र गावित (पालघर), हेमंत पाटील (हिंगोली) आणि गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर-पश्चिम) यांचे पुनर्वसन कसे होणार हा देखील प्रश्न आहे.
त्याचप्रमाणे जूनमध्ये विधान परिषदेच्या ११ सदस्यांची निवडणूक होणार असून विधानसभेतून विधान परिषदेवर उमेदवार पाठवले जातील. तेथे काहींना संधी दिली जाऊ शकते. पण खासदारकीवरून आमदारकीवर त्यांना यावे लागेल.
तसेच यातील काहींना आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाऊ शकेल. मोठ्या महामंडळाचे अध्यक्षपद देऊन देखील पुनर्वसन केले जाऊ शकते.
१४ आमदार लोकसभेच्या रिंगणात
राज्यातील विधानसभेचे १३ आणि विधान परिषदेचे एक असे १४ आमदार खासदारकीसाठी उभे आहेत. त्यातील नीलेश लंके यांनी राजीनामा दिलाय. इतरांमध्ये यामिनी जाधव, सुधीर मुनगंटीवार, संदीपान भुमरे, वर्षा गायकवाड, विकास ठाकरे या आमदारांचाही समावेश आहे.
या आमदारांसोबतच प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, बळवंत वानखेडे, रवींद्र धंगेकर, मिहीर कोटेचा, प्रणिती शिंदे, राम सातपुते, शशिकांत शिंदे हे आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरलेत.