देशाच्या राजकारणात, समाजकारणात, धार्मिक क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एका महत्वपूर्ण भूमिकेत राहिलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैशिष्ठ्यपूर्ण योगदान राहिले असल्याचे म्हटले जाते. दरम्यान भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानुसार चालतो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच भाजप सत्तेत आले असे देखील म्हटले जात होते.
परंतु आता नुकतेच भाजपला रा.स्व. संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम झालो आहोत. भाजप आता स्वतःच्या बळावर चालते. संघ ही वैचारिक आघाडी आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका मुलाखतीमध्ये केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नड्डा पुढे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पक्षाला रा.स्व. संघाची गरज होती. त्यावेळी भाजपची क्षमता कमी होती. आता ती वाढलेली आहे.
आम्ही आधीपेक्षा सक्षम झालो आहोत. भाजप आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो असे हे वक्तव्य होते व त्यावरून मोठा राजकीय गदारोळही उठलेला पाहायला मिळाला. नड्डांचे हे वक्तव्य भाजपचे पैतृक संघटन संघासोबत बंडखोरी करण्यासारखे आहे अशी चर्चा सध्या होत आहे. परंतु इतिहासातील काही दाखले पाहता भाजप ती चूक करणार नाही अशीही चर्चा आहे.
अडवाणींना महत्वहिन बनविण्यात आले होते !
लालकृष्ण अडवाणी यांचे संघामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान होते. अटलबिहारी वाजपेयी यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. यानंतरही जेव्हा स्वतःला धर्मनिरपेक्ष दाखवण्यासाठी कराचीमध्ये पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करून त्यांची प्रशंसा केली, तेव्हापासून अडवाणी संघाच्या नजरेतून पडले. संघाने त्यांना दुर्लक्षित केले.
संघाचे अनुशासन पाहू जाता अडवाणीचे समर्थक नेते अरूण जेटली, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, शिवराज सिंह चौहान हे याबद्दल ‘ब्र’ शब्दही उच्चारू शकले नाहीत अशी चर्चा जुने जाणते राजकीय विश्लेषक करताना दिसतात.
नेहमीच दिसून आले संघाचे वर्चस्व
जरी रा.स्व. संघ स्वतःला सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगत असले तरी राजकारणात मात्र संघाचा हस्तक्षेप असतोच. संघाचे स्वयंसेवक त्यांच्या मर्जीनुसार कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे संघ म्हणत असला तरी संघाच्या शाखेत वाढलेले कार्यकर्ते प्रथम जनसंघात आणि आता भाजपमध्येच सहभागी होतात. इतर पक्षाकडे त्यांचा कल नसतोच. संघाने त्यांची विचारसरणी सोडून जाणा-यांना कधीही क्षमा केलेली नाही.
जेव्हा जनसंघाची स्थापना झाली होती, तेव्हा डॉ. रघुवीर आणि मौलीचंद्र शर्मा यांच्यासारख्या जनसंघाच्या अध्यक्षांना रा.स्व. संघाने बाहेरचा रस्ता दाखविला होता. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जनता पक्षाचे सरकार बनले होते, तेव्हा मधु लिमये आणि राजनारायण यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा दुहेरी सदस्यत्वाचा प्रश्न उचलला तेव्हा दोन्ही मंत्र्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
जेव्हा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा संघाचा प्रचंड दबदबा होता. तेव्हा वाजपेयी यांच्या धोरणावर नानाजी देशमुख आणि दत्तोपंत हेंगडी या संघाच्या नेत्यां नी इशारा दिला होता, त्यामुळे वाजपेयी यांनी निर्गुतवणूक धोरणावरून निर्णय घेतला नव्हता आणि निर्गुतवणूक मंत्री अरूण शौरी यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले होते असे विश्लेषण एका मीडियातील लेखात देण्यात आले होते.