Ahilyanagar Politics : अहमदनगरमधील कर्डीले-जगताप-थोरात-राजळे-गडाख सगेसोयरे कात्रीत ! कोण कुणाचे काम करतो पाहण्यासाठी पक्षश्रेष्ठींची ‘खास’ माणसे ‘वॉच’वर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघ येत असून या दोन्ही मतदार संघात उमेदवार फायनल झाले आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ‘सोधा’ फॅक्टर अर्थात सोयरेधायरे फॅक्टर जास्त चालतो हे सर्वश्रुत आहे. कर्डीले-जगताप-थोरात-राजळे-गडाख-घुले ही मातब्बर मंडळी एकमेकांची सोयरी आहेत.

वेगवेगळ्या पक्षात असले तरी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची आणि करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा, ते येथील सोयरेधायरेच ठरवितात अशी चर्चा नेहमीच केली जाते. आता सध्या लोकसभा निवडणूक लागल्या असून हे सोयरेधायरे राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटताना दिसत आहेत.

राजकीय उलथापालथीमुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत दगाफटका होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून काही खास माणसेही मतदारसंघात पाठविल्याचे बोलले जाते. त्यामुळे यावेळी आदेश पाळावाच लागेल अशी चर्चा सध्या जाणकार लोकांत रंगली आहे.

सगेसोयरे एकेमकांच्या विरोधात
जिल्ह्यातील राजकीय नेते नातेवाईक असले तरी आपापल्या पक्षाचा झेंडा घेऊन ते निवडणुकीत उतरलेले दिसतात. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत गाडे आघाडीचा प्रचार करत असून, त्यांचे नातेवाईक असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले महायुतीसाठी खिंड लढवीत आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आघाडीसाठी, तर त्यांच्या नातेवाईक असलेल्या आमदार मोनिका राजळे या महायुतीसाठी मते मागताना दिसत आहेत.

माजी आमदार चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आहेत, तर आमदार शंकरराव गडाख उद्धव ठाकरे सेनेसोबत आहेत. आमदार गडाख हे दोन्ही मतदारसंघांतील आघाडीच्या उमेदवारासाठी सक्रिय आहेत. गडाख यांचे नातेवाईक श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप महाविकास आघाडीसोबत आहेत. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नातेवाईक आहेत.

या पक्षाची जबाबदारी पाटील यांच्यावर आहे. तनपुरे यांनी राहरीतून महाविकास आघाडीला मताधिक्य देण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपसोबत आल्याने सासरे कर्डिले व जावई आमदार संग्राम जगताप, हे दोघेही यावेळी महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत.

वरिष्ठांकडून नजर ?
कोणत्याही परिस्थितीत दगाफटका होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून काही खास माणसेही मतदारसंघात पाठविल्याचे बोलले जाते. दगाफटका केल्यास त्याची किमत सर्वांनाच मोजावी लागेल. म्हणून एकमेकांचे नातेवाईक असले तरी निवडणुकीत ते अंतर ठेवून असतील अशी चर्चा सध्या रंगल्याचे पाहायला मिळत आहे.