Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातला राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. या निवडणुकीत ते आमने-सामने आहेत, यामुळे हा राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाणार याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काल सुजय विखे पाटील यांनी नवी मुंबई येथील कामोठे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एवढा भव्य होता की, कालपासून याच कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुजय विखे पाटील यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. कामोठे येथे पारनेर तथा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध भागातली जनता मोठ्या प्रमाणात कामानिमित्त तसेच उद्योगानिमित्त वास्तव्याला आहे. कामोठे येथे नगर दक्षिणचे मतदार कामानिमित्त वास्तव्याला असल्याने त्या ठिकाणी या सभेचे आयोजन करून सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे निलेश लंके हे जनसंवाद यात्रेत असून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील सर्व नेते आणि कार्यकर्ते दिसून येत नाहीत.
खासदार विखे पाटील यांनी मात्र आज महायुतीमधील मित्र पक्षांना एकत्रित आणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली आहे. महायुती मधील सर्वच पक्ष सुजय विखे यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत हे त्यांच्या कृतीमधून स्पष्टपणे दिसत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट यांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा देखील झाला आहे. या मेळाव्यात या दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुजय विखे यांना विजयी बनवण्याचा निर्धार केला आहे.यावरून सुजय विखे यांनी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत समन्वय साधला असल्याचे स्पष्ट होत आहे.
मात्र निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून सपोर्ट मिळत असला तरी देखील महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षांचे नेते अजूनही लंके यांच्यापासून अंतर ठेवून आहेत. नगर दक्षिणमध्ये ठाकरे गटाची बऱ्यापैकी ताकद आहे मात्र ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही लंके यांच्या समर्थनार्थ प्रचारात उतरले नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस देखील लंके यांच्यापासून सध्या तरी दोन हात अंतर ठेवून आहे.
पारनेर हा विधानसभा मतदारसंघ लंके यांचा हक्काचा आहे, असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही कारण की ते पारनेरचे आमदार होते. पण, आता पारनेर मध्ये देखील त्यांची लोकप्रियता कमी होईल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. पारनेरमध्ये सुद्धा लंके यांचा आता विरोध वाढू लागला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पारनेरमध्ये माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी त्यांना मोठी साथ दिली होती. लंके यांच्या विजयात त्यांचा खारीचा वाटा होता.
परंतु आता त्यांनी देखील लंके यांची साथ सोडलेली आहे. औटी यांनी यावेळी विद्यमान खासदारांना रसद पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली असून काल नवी मुंबई मधील कामोठे येथे सांस्कृतिक कार्यक्रमांच जे आयोजन होतं ते आयोजन औटी यांनी स्वतः केलं. कालची सभा ही खूपच भव्य होती आणि या सभेतून औटी यांनी विखे यांच्यासाठी चांगली वातावरण निर्मिती केली आहे.
नवी मुंबई मध्ये पारनेर व आजूबाजूच्या परिसरातील मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता सुजय विखे यांची विजयाची शक्यता पहिल्या टप्प्यात बळावली आहे. लंके महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून लोकसभा लढवावी यासाठी काँग्रेसने देखील पाठपुरावा केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी लंके यांच्यावर स्तुती सुमने उधळली होती. मात्र ग्राउंडवरील वास्तविकता वेगळेच चित्र दाखवत आहे.
त्यांच्या राहुरी आणि पाथर्डीच्या दौऱ्यात प्रताप ढाकणे आणि आमदार प्राजक्त तनपुरे हे दोन नेते वगळता इतर महाविकास आघाडी मधील जेष्ठ नेते अजूनही लंके यांच्यापासून अंतर ठेवून आहेत ही लंके यांच्यासाठी धक्कादायक बाब असल्याचे राजकीय विश्लेषक नमूद करत आहेत. लंके हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असूनही ठाकरे गटाने, काँग्रेसने आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्यांच्यासाठी साधी एक बैठक देखील आयोजित केलेले नाही. दुसरीकडे सुजय विखे यांच्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी याकरिता संपूर्ण महायुती कामाला लागली आहे. सुजय विखे यांच्यासाठी शिंदे गटाचा, अजित पवार गटाचा मेळावा झाला आहे.
गेल्यावेळी सुजय विखे यांच्या विरोधात उभे असलेले संग्राम जगताप यावेळी विखें यांच्या विजयासाठी जोरदार फिल्डिंग लावत आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहटा यांसारखे दिग्गज मंडळी विखे यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून या नेत्यांनी खऱ्या अर्थाने महायुतीचा धर्म जोपासला आहे. यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सुजय विखे पाटील आघाडीवर आहेत. दुसरीकडे निलेश लंके हे प्रचारात तर मागे आहेतच, महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यापासून अंतर ठेवून आहेतच शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे देखील त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
खा.विखे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विखेंना गोळ्या झाडणारच असे या निलेश लंके समर्थकाने म्हटले आहे. याची ऑडिओ क्लिप देखील सध्या नगरमध्ये वेगाने व्हायरल होत आहे. कामोठे येथे झालेल्या भव्य सभेत स्वतः सुजय विखे पाटील यांनी देखील ही ऑडिओ क्लिप उपस्थित जनतेला ऐकवली आहे. लंके समर्थकाची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने लंके यांच्या दहशतीच्या राजकारणाचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने समोर आला आहे.