Ahmednagar Politics : लग्नसराई संपली आता थेट २९ जूनलाच मुहूर्त ! नेते, कार्यकर्त्यांसह प्रशासनालाही दिलासा, मतदानावरही परिणाम होणार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar Politics : मे महिना व लगीनसराई हे तसे जुळलेले गणित. परंतु आता २ मे नंतर थेट २९ जून पर्यंत आता मुहूर्त नसल्याने लगीनसराईला ब्रेक लागला आहे. याचा परिणाम निवडणुकांच्या आखाड्यावर होणार असून लग्नांना ब्रेक लागल्याने नेते, कार्यकर्त्यांसह प्रशासनालाही दिलासा मिळालाय.

लग्नसोहळे सुरु असल्याने या सोहळ्यांमध्ये उपस्थिती लावल्यामुळे हजारो लोकांसमोर थेट प्रचाराला संधी मिळायची. आता मात्र २ मे पासून लग्नसराईला ब्रेक मिळाला आहे.

त्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धावपळ कमी झाली आहे. तसेच लग्नसराई नसल्याने मतदानाचा टक्का वाढणार असल्याचा विश्वासही अधिकारी व्यक्त करत आहेत.

लग्नसोहळे..प्रचार अन धावपळ..
अहमदनगर जिल्ह्यात सध्या ४० ते ४१ अंश तापमान आहे. या तापमानात लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला आहे. अशा तापलेल्या उन्हातही नेते. कार्यकर्त्यांना लग्नसोहळ्यांना हजेरी लावावी लागत होती.

लग्नसोहळ्यांचे ठिकाण हीच प्रचारासाठी मोठी संधी होती. त्यामुळे मोठ्या धावपळीतून उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते लग्नसोहळ्यांना आवर्जून हजेरी लावत होते. इथेही उमेदवार आले की, त्याची चर्चा व्हायची. त्यामुळे एक प्रकारे त्यांचा अप्रत्यक्ष प्रचारच होता.

तसेच एकाच दिवशी अनेक लग्नसोहळे असल्याने वेळेत पोहोचण्यासाठी नेत्यांची चांगलीच धापवळ झाली. इतर प्रचार सभा सोडून लग्नसोहळ्यांना हजेरी लावणे हे गरजेचे झाले होते. आता मात्र या लग्नसोहळ्यातून नेत्यांची सुटका झाली आहे

मतदानावर परिणाम
मे महिन्यामध्ये लग्नतिथी असत्या तर अनेक लोकं लग्नात अडकून राहिल्याने व बाहेरगावी गेल्याने थोडाफार का होईना मतदानावर परिणाम झाला असता. तसेच मंडपात जाऊन अनेकांना मतदानासाठी बाहेर काढण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली असती. मात्र, या धावपळीतून प्रशासन, कार्यकर्त्यांची सुटका झाली आहे झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे.

प्रचार शेवटच्या टप्प्यात
अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात १३ मे ला मतदान आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी सहा दिवस उरले आहेत.

११ मे ला प्रचाराचा समारोप होईल. त्यामुळे आता या आठवड्यात उमेदवारांच्या प्रचार सभा, रॅली, चौक सभा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. स्टार प्रचारकांच्या प्रचारसभांची रणधुमाळी असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe