Ahmednagar Politics : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने आज प्रचार सभांचा शेवट आहे. खा. सुजय विखे यांनी आज शेवटच्या दिवशी मतदार संघात विविध ठिकाणी सभा घेतली.
यातील श्रीगोंदे येथील सभा विशेष गाजली. याचे कारण म्हणजे ही सभा सुरु असतानाच पाऊस सुरु झाला आणि विखेंच्या भाषणाला आणखी धार चढली. यावेळी उपस्थित नागरिकांचा उत्साहही आणखी द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.
पारनेरपर्यंत आवाज जाऊ द्या..
यावेळी बोलताना खा. सुजय विखे यांनी नरेंद्र मोदी यांची देश संकल्पना व मतदार संघात झालेला विकास व आणखी करावयाचा विकास याबाबत संकल्पना मांडली. यावेळी त्यांनी भरसभेत सर्वाना प्रश्न केला,
भर सभेत जिल्हाधिकारी, बीडीओ, पोलीस यांना अपशब्द वापरणारा उमेदवार पाडायचा की नाही? यावेळी उपस्थित समर्थकांनी ‘पाडायचा’ अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे यांनी सांगितले की हा आवाज आता पारनेरपर्यंत जाऊ द्या. असे म्हणताच या आवाजाची धार आणखी चढली.
विकास हाच अजेंडा..
आज विविध ठिकाणी झालेल्या सभेत ते म्हणाले, लोकसभा मतदार संघातील युवकांचा रोजगारचा प्रश्न महत्वाचा आहे. जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा आहेत पण नोकरीसाठी बाहेर जावे लागते. पण हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा याकरीता औद्योगिक विकास करण्याशिवाय पर्याय नाही.
म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर आणि श्रीगोंदा येथे औद्योगिक वसाहती करीता जागांची उपलब्धता करून दिली. आता नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत.
त्यामुळेच अहील्यानगर एक औद्योगिक केंद्र विकसित करण्याचे आपला प्रयत्न असल्याचा मनोदय खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभरहून अधिक योजना सुरू केल्या.
या योजना सुरू करतानाच कुठेही गरीब, श्रीमंत असा किवा जातीभेद निर्माण न करता सर्व योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कसा मिळेल याचा यशस्वी प्रयत्न केला. शासन आपल्या दारी या उपक्रमातून योजना लोकांपर्यत पोहचविल्या त्यामुळेच शासन योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आज अहील्यानगर मध्ये आहेत असेही ते म्हणाले.
श्रीगोंद्यात भर पावसात ‘बॅटिंग’
विशेष म्हणजे आज श्रीगोंद्यातील सभेवेळी जोरदार पाऊस सुरु झाला. परंतु भरपावसात विखे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. त्यांनी भर पावसात तुफान बॅटिंग करत विरोधकांवर फटकेबाजीही केली. विशेष म्हणजे यामुळे आलेले नागरिकही हलले नाहीत. जसजसा पाऊस वाढत गेला तसतसा विखे यांचा उत्साह व नागरिकांचाही उत्साह वाढत गेला.