Ahmednagar Politics : राहुरी मतदार संघात आघाडी विखे यांना की लंकेंना ? पहा नव्याने समोर आलेला उलगडा

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe lanke

Ahmednagar Politics : अहमदनगरसाठी १३ मे ला मतदान झाले व खा. सुजय विखे व निलेश लंके या दोघांचेही राजकीय भविष्य मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत राहुरी तालुक्यात जास्त मतदान झाले.
सध्या राहुरीत चौकाचौकांत, पारावर व सोशल माध्यमांवर जो तो आपलाच उमेद्वार कसा निवडून येणार? याची मांडत असून दावे यामुळे तालुक्याच्या गणिते प्रतिदावे राजकीय वातावरणात राजकारणाचा ‘फिव्हर’ अजून टिकून आहे.

कट्टया-कट्ट्यावर आमचाच उमेदवार निवडून येणार यावर पैजा लगल्या असून कोणत्या भागात कोणाला मताधिक्य मिळणार याची चर्चा रंगत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपचे खा. डॉ. सुजय पाटील व राष्ट्रवादी विखे काँग्रेस शरद पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत पाहवयास मिळाली.

मागील निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आ. संग्राम जगताप अशी लढत झाली होती. या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी अडीच लाखांच्या आसपास मताधिक्य घेत ही जागा जिंकली होती. या मताधिक्यात सर्वाधिक वाटा राहुरी मतदार संघाचा होता. त्यावेळी राहुरीच्या डॉ. तनपुरे कारखान्याची सत्ता हातात घेऊन डॉ. विखे पाटील यांनी बंद पडलेला डॉ. तनपुरे कारखाना यशस्वी सुरू करून तालुक्यातील मतदारांचा विश्वास संपादन केला होता.

राहुरीला विखे नेहमीच आपले ‘होम ग्राउंड’ समजतात. व त्यावेळी असलेले राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचीही त्यांना भक्कम साथ होती व आताही आहे. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी, नगर पाथर्डी मतदार संघाची निवडणूक आ. प्राजक्त तनपुरे यांनी विखेंना मिळालेले मतदार संघातील ७१ हजारांवरील मताधिक्य कापून काढताना जवळपास २५ हजार मतांच्या फरकाने शिवाजी कर्डिले यांना पराभूत केले होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी शासनात आ. प्राजक्त तनपुरेंना सहा खात्यांसह राज्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करीत आ. तनपुरे यांनी राहुरीसह नगर पाथर्डीच्या भागात विकास कामांच्या माध्यमातून संपर्क वाढवून आपले स्थान मजबूत केल्याचे दिसत आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व भाजपा यांची संयुक्त महायुती सत्तेत आल्यावर शिवाजी कर्डिले व खा. डॉ. विखे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून राहुरी मतदार संघात संपर्क वाढविला. परंतु या निवडणुकीच्या सुरूवातीला राहुरी विधानसभा मतदार संघात बंद पडलेला डॉ. तनपुरे कारखाना, दुधाचे पडलेले दर, कांदा निर्यात, नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था आदी समस्या खा. डॉ. विखेंना बॅकफुटवर खेचताना दिसत होत्या.

मात्र त्यांच्या प्रचार यंत्रणेच्या उत्कृष्ट नियोजनाने त्यावर मात करून राहुरी तालुक्यात चांगल्याप्रकारे मतदान घेतल्याची चर्चा आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद माजी आ. कर्डिले यांच्याकडे असताना त्यांना डॉ. तनपुरे कारखाना का वाचविता आला नाही म्हणून या निवडणुकीत कर्डिले फॅक्टर खा. डॉ. विखेंसाठी फारसा उपयोगी ठरताना दिसत नव्हता. डॉ. विखेंनी स्वबळावरच तालुक्यात आपली पूर्ण ताकद लावून निवडणुकीला सामोरे गेल्याचे चित्र जाणवत होते. राहुरी तालुक्यातील प्रवरा पट्ट्यात त्यांना चांगले मतदान झाल्याची चर्चा आहे.

राहुरी ही शेती व शेतकरी या वर्गावरच अवलंबून असल्याने दुधाचे पडलेले दर, खतांचे वाढलेले भाव, कांदा निर्यातीत धरसोड धोरण, सोयाबीन, कापसाचे बाजारभाव, संविधान बदल, केंद्राची व राज्याची धोरणे हे मुद्दे विरोधकांनी प्रचारात प्रमुख केले होते. मध्यंतरी अनेक विकास कामांवरून श्रेयवादाचा कलगीतुरा रंगला होता.

निळवंडे धरणाच्या कालव्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून या कालव्यांना विखे यांनी पाणी सोडले होते. मात्र, या कालव्यांना तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी १२०० कोटी रुपये निधी देऊन वनखाते व इतर अडचणींची सोडवणूक केल्याने या कालव्यांना पाणी सोडता आल्याचा दावा खुद्द शरद पवार यांनी व राष्ट्रवादीने तालुक्यातील अनेक प्रचार सभेत करून विखेंवर निशाणा साधला होता.

आ. निलेश लंके यांच्या प्रचाराची सर्व धुरा माजीमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या खांद्यावर असल्याने संपूर्ण तनपुरे कुटुंब व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत कंबर कसली होती. आ. लंकेंनी कोविड काळात केलेले काम, कांदा निर्यातीसंबंधी केलेली आंदोलने, सर्वसामान्यांशी त्यांचा असलेला स्नेह व सर्वसामान्य कुटुंबातील उमेद्वार ही प्रचारात जमेची बाजू ठरत होती. तर विखेंचे पुर्वीपासूनच राहुरीत कार्यकर्त्यांचे, नातेवाईकांचे मोठे संघटन असून ही सर्व मंडळी प्रचारात आघाडीवर दिसत होती.

एकूणच या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा चुरशीची लढत झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही उमेद्वारांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राहूरी विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त विक्रमी मतदान झाले. मतदानाचा वाढता टक्का नेमके कोणाला कौल देणार? हे येत्या ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe