Ahmednagar Politics : लोकसभेचा धुराळा अन हवाईप्रवासाचा धडाका हे समीकरण आता नवीन राहिलेले नाही. विशेष म्हणजे नगर शहरात विमानतळ नाही. तरी देखील हेलिकॉप्टर प्रवास व इतर गोष्टी नगरकरांना नवीन नाहीत.
आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुशंघाने तब्बल १८ हेलिकॉप्टर नगरमध्ये उतरणार असल्याची शक्यता आहे. याआधी ३० एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या १३ महिन्याच्या कालावधीत नगर शहरातील पोलीस परेड मैदानावर तब्बल १७ खाजगी हेलिकॉप्टर उतरले आहेत. यासाठी किती खर्च येतो? हेलिपॅडसाठी किती पाणी लागते? एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे लाखो लिटर पाणी आदी सगळी गणिते आपण येथे पाहुयात –
किती झाला हवाई प्रवास?
सर्वाधिक हवाई प्रवास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा समावेश असल्याचे दिसते. नगर शहरात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी १४ व २६ फेब्रुवारी २०२४, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी २५ मे २०२३ व २६ में २०२४ या कालावधीत नगरचा प्रवास हेलिकॉप्टरने केला आहे.
२९ फेब्रुवारी २०२४ ला मंत्री रवींद्र चव्हाण नगरला हेलिकॉप्टरने आले होते. २१ में २०२३ ला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे १० ऑक्टोबर २०२३ ला हेलिकॉप्टर आले होते. दरम्यान या हवाई प्रवासात नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांचा देखील समावेश.
हेलिपॅड बनवण्यासाठी किती खर्च येतो ?
एक हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅडचे मैदान तयार करणे, अग्निशामक वाहन ठेवणे, रुग्णवाहिका ठेवणे यासह अन्य कामासाठी प्रशासनाला ४५ हजार रुपयांचा खर्च येतो.
एका हेलिपॅडसाठी लागते दीड लाख लिटर पाणी
नेते, मंत्री यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी बांधकाम विभाग, महसूल यासह विविध विभागांच्या परवानग्या लागत असतात. त्यासाठी एक दिवस अगोदर मैदानावर पूर्वतयारी करावी लागते. मैदानावर हेलिपॅड तयार करण्यासाठी एकाच वेळेस दीड लाख लिटर पाणी लागते.
एकीकडे दुष्काळ दुसरीकडे लाखो लिटर पाणी
सध्या कमी पावसामुळे नगर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. जलसंपदाने २० टक्के पाणी कपातीचा निर्णयायी घेतला आहे. अनेक गावांत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे ही स्थिती असताना एप्रिल-मे महिन्यात टँकरद्वारे हेलिपॅड तयार करण्यासाठी लाखो लिटर पाणी आणले जाण्याची शक्यता आहे.