Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निवडणूक आपल्या महाराष्ट्रात अधिक रंजक बनली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राज्यातील शिवसेना या प्रमुख पक्षात उभी फूट पडली. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट झालेत. पुढे राष्ट्रवादीमध्ये देखील तसेच घडले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन पक्ष तयार झालेत. दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या या राजकीय भूकंपामुळे यंदाची निवडणूक ही खूपच काटेदार होणार असे बोलले जात आहे. पण, यामुळे राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पक्षावर किती निष्ठा आहे? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. निवडणुकीत फक्त नेत्याकडेच पाहून मत दिले जात नसते तर तो नेता कोणत्या पक्षाचा आहे याकडे देखील पाहिले जाते.
मात्र नेतेमंडळी सर्रासपणे आपले राजकीय हित जोपासत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी हाणतात. महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशभरात असेच चित्र आहे. आपल्या नगर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. यामुळे अहमदनगरमध्ये उत्तरेकडील शिर्डी लोकसभा मतदारसंघात आणि दक्षिणेकडील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.
यंदा महायुतीने तथा महाविकास आघाडीने शिर्डी आणि नगर दक्षिण मध्ये जे उमेदवार उतरवलेले आहेत ते सारे उमेदवार आयात केलेले म्हणजे स्थलांतरित उमेदवार आहेत. हे सारे उमेदवार कधी ना कधी दुसऱ्या पक्षात राहिले आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार दिला आहे.
भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीत विजयी पताका फडकवणाऱ्या विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा या जागेवरून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या जागेवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) उमेदवार दिला असून त्यांनी पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना तिकीट दिले आहे. शिर्डी बाबत बोलायचं झालं तर या जागेवरून महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) पक्षाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिकीट दिले आहे.
तर, महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिले आहे. मात्र महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे हे चारही उमेदवार कधी काळी आज आहेत त्या पक्षात नव्हते. म्हणजेच हे चारही उमेदवार स्थलांतरित आहेत. नगर जिल्ह्यात घडलेला कदाचित हा पहिला-वहिला अन एक दुर्मिळ राजयोग असावा. दरम्यान आता आपण हे चारही उमेदवार आधी कोणत्या पक्षात होते याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डॉक्टर सुजय विखे पाटील : नगर दक्षिणचे विद्यमान खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील हे कधीकाळी काँग्रेसमध्ये होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना नगर दक्षिणचे तिकीट मिळाले नाही, म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान भाजपाने त्यांना दुसऱ्यांदा या जागेवरून तिकीट दिले आहे.
निलेश लंके : पारनेरचे माजी आमदार तथा नगर दक्षिणचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. पुढे मात्र शिवसेनेने त्यांना पक्षातून काढले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा आणि पारनेरच्या आमदारकीचा राजीनामा देत आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे.
सदाशिव लोखंडे : शिर्डी लोकसभेचे विद्यमान खासदार तथा शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपामधून झाली. भाजपनंतर ते काही काळ मनसेमध्ये गेलेत. यानंतर त्यांनी शिवबंधन बांधलं. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटाने आता त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे.
भाऊसाहेब वाकचौरे : भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा ठाकरे गटाचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेना पक्षातून झाली. पुढे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. आता ते भाजप सोडून ठाकरे गटात आहेत.