Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर व शिर्डीसाठी मतदान झाले व त्यानंतर प्रशासनाने ईव्हीएम मशिन सर्व मतदान केंद्रांवरून आणल्यानंतर एमआयडीसीतील शासकीय गोडाऊन मध्ये ठेवले आहेत.
जिल्हाभरातील मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे सोमवारी (ता. १३) रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशिन स्ट्रॉग रूमवर पोहोचल्या. या स्ट्रॉग रुमला तीन टप्प्यांत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. स्ट्राँग रुममध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांची तुकडी तैनात आहे.
त्यानंतर एसआरपीएफची तुकडी व स्थानिक पोलिसांचा पहारा आहे. अहमदनगर मतदार संघात अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी सहा वाजेनंतर मतदान सुरू होते. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशिन एमआयडीसी येथील गोडाऊन येथे आणण्यासाठी वेळ लागला,
४ जून रोजी मतमोजणी होणार असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. स्ट्रॉग रूमच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय राजपत्रित अधिकाऱ्यांची टीम ८ तासांच्या शिफ्टमध्ये स्ट्रॉग रूमला भेट देणार आहे.
या ठिकाणी ४ जूनपर्यंत कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. स्थानिक पोलिसांसोबतच एसआरपीएफ आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे सुरक्षा जवान स्ट्रॉग रूम परिसरात तैनात आहेत.
अशी आहे सुरक्षा –
पोलिस निरीक्षक – २
एपीआय, पीएसआय – ७
पोलिस अंमलदार – ५९
एसआरपीएफ तुकडी – १
सीआरपीएफ तुकडी – १
तीन स्ट्राँग रूममध्ये विभागणी
शिर्डी लोकसभा मतदार संघातील १ हजार ७०८ मतदान केंद्र व नगर लोकसभा मतदार संघातील दोन हजार २६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन एमआयडीसी येथे ठेवण्यात आल्या. त्यासाठी तीन स्ट्रॉग रूम उभारण्यात आल्या आहेत
वेब कास्टिंगची सोय
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांच्या ईव्हीएम मशिन तीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉग रूमची सुरक्षा यंत्रणा पाहण्यासाठी वेब कास्टिंगची सोय करण्यात आली आहे. त्या माध्यमातून स्ट्रांग रूमच्या बाहेर लावण्यात आलेल्या स्क्रिनवर उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुरक्षाव्यवस्थेची खातरजमा करता येणार आहे
८० सीसीटीव्ही
शासकीय गोडाऊन येथे नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या तीन स्ट्रांग रूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्ट्राँग रुम मध्ये ८ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. यासोबतच दोन मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत. तीन स्ट्रॉग रुम व दोन मतमोजणी केंद्र अशा पाच ठिकाणी एकूण ८० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.