Ahmednagar Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अहमदनगरच्या राजकारणाचे महत्वपूर्ण स्थान राहिले आहे. सर्वच राजकीय पक्षांची नजर अहमदनगर जिल्ह्यावर असते. ही राजकीय पकड मजबूत करण्यासाठी पवारांसह, फडणवीस, ठाकरे आदी नेते प्रयत्नशील असल्याचे दिसते.
दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व व काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल झालेल्या गौप्यस्फोटाने राजकरणात विविध चर्चा रंगल्या आहेत.
थोरात यांचे भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले असून केवळ प्रवेशाची औपचारिकता बाकी असल्याचा गौप्यस्फोट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.
काय म्हणाले विखे पाटील ?
संगमनेर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी राजकीय दावा करत चर्चांना उधाण आणले आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची अवस्था सध्या दिवस आहे तोच मातोश्री, संध्याकाळी सिल्वर ओकवर व रात्री भाजपच्या लोकांसोबत ते दिसून येतायेत.
थोरात यांचे भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले असून केवळ प्रवेशाची औपचारिकता बाकी असल्याचा दावा त्यांनी केलाय, शिवाय सोबतच थोरात भाजपात आले तर त्यांचे स्वागत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय.
आ. थोरातांच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विखे पाटील पिता-पुत्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट केला होता. आपल्याही कानावर तसे आले आहे
असे म्हणत आ. थोरात यांनी त्यांना एकप्रकारे दुजोराच दिला होता. आता याचाच समाचार घेत विखे पाटील यांनी उलट थोरात यांचाच भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केलाय.
पवार हतबल झालेत
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असे भाकित जे शरद पवार यांनी केले होते त्याबाबत बोलताना विखे म्हणाले, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले असल्याने ते हतबल झालेत.
त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत असून पवार यांच्यासोबत आता किती सहकारी राहिलेत? असा सवाल करत त्यांना टोला लगावला आहे.