Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात ज्या पद्धतीने अहमदनगर लोकसभेचा फिव्हर आहे तसाच उत्तरेत शिर्डीबाबतही आहे. विखे – लंके यांची लढत जशी रंगली आहे तशीच लढत वाकचौरे-लोखंडे रंगणार आहे.
उत्तरेत महाविकास आघाडीची अर्थात भाऊसाहेब वाकचौरे यांची भिस्त ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरातांवर असणार आहे. सध्या आ. बाळासाहेब थोरात हे दोन्ही मतदार संघात फिरत असून सभा, बैठकांना हजेरी लावत आहेत.
दरम्यान सध्या त्यांच्या एका वक्तव्याची चर्चा जोरदार रंगली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्देशून एका सभेत एक वक्तव्य करत आवाहन केले होते.
काय म्हणाले होते आ. थोरात
ते म्हणाले होते की, मताधिक्य मिळेल, असे बोलू नका व त्या गैरसमजात देखील तुम्ही राहिले नाही पाहिजे. आपल्याला मतदान घडवावे लागेल हे लक्षात ठेवा. विजय आपलाच आहे पण काळजी घ्या असेही थोरात यांनी सांगितले होते.
काय असतील या वक्तव्यामागणी राजकीय गणिते?
आ. बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. जवळपास ४० वर्षांपेक्षा जास्त त्यांनी राजकारणात घातली आहेत. ते दिग्गज व अनुभवी राजकारणी आहेत.
त्यांना राजकारण कसे खेळावे व राजकारणी लोकांनी कसे असावे याबाबत चांगलेच ज्ञान आहे. तसेच राजकारणात शत्रूला कधीही कमी समजले नाही पाहिजे व आपल्या डोक्यात विजयाची हवा गेली नाही पाहिजे हे गमक त्यांना नक्कीच माहिती आहे.
त्यामुळे त्यांचे वरील वक्तव्य हे याच मुरब्बी तत्वज्ञानातून आले असावे. त्यांनी देखील या वक्तव्यानंतर आपली पुष्टी जोडताना म्हंटले होते की, तीन लाखांच्या लीडच्या गप्पा केल्या की, आमचा गडी थंड होताना दिसतो. त्यामुळे आमचा गडी जास्त पळत नाही.
त्यामुळे गैरसमजात न राहता पळत राहा. तुम्ही निश्चितच निवडून येणार आहेतच परंतु मतदारांना आणखीन समजावून सांगावे लागेल असा एक शहाणपणाचा सल्लाच जणू त्यांनी दिला होता.