Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डीचा लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचणार आहे. दक्षिणेप्रमाणे उत्तरेतही आता लोकसभेचे रण तापले आहे. खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ स्वतः राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर दिसतायेत.
दरम्यान लोखंडे यांच्या प्रचारार्थ राजकीय कट्टर विरोधक आ.डॉक्टर किरण लहामटे व ज्यष्ठ नेते मधुकर पिचड एकाच व्यासपीठावर एकाच उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी समोर आले. अकोले शहरात महायुतीचा मेळावा पार पडला यावेळी कट्टर विरोधक आमदार लहामटे व पिचड पिता पुत्र हे प्रथमच एका मंचावर एकत्र पाहायला मिळाले.
यावेळी ज्यष्ठ नेते मधुकर पिचड यांनी आम्ही आपापसात लढणारे आता एकत्र आलो असून ही निवडणूक माझी, माझ्या मुलाची किंवा आमदार लहामटे यांची नसून ही निवडणूक मोदींची असल्याचे सांगत उमेदवाराच्या विजयासाठी सर्व एकत्रित प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी विखे पाटील यांना दिला.
काय म्हणाले पिचड
पिचड म्हणाले, मोदी साहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपल्याला काम करायचेच असून विरोधकांच्या भूलथापांना बळी पडून आपल्याला चालणार नाही. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदावर मोदींनी बसवलेलं आहे. विखे पाटील आम्ही आपापसात लढणारे आता एकत्र आलो असून ही निवडणूक माझी, माझ्या मुलाची किंवा आमदार लहामटे यांची नसून ही निवडणूक मोदींची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री विखे यांचा आ. थोरातांवर अप्रत्यक्ष घणाघात
राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना इंडिया आघाडीवर टीका करत आ. बाळासाहेब थोरातांवरही अप्रत्यक्ष घणाघात केला. ते म्हणाले, एका बाजूला मोदीजी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढताना आपल्याला दिसतात आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी मात्र त्यावर पांघरून घालताना दिसत आहे.
तसेच काँग्रेसचा पूर्ण सुपडा साफ झाला असून आपल्या जिल्ह्याचे नेते राज्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांना स्वतःच्या जिल्ह्यातील एक जागा मिळवता आली नाही असा टोला त्यांनी लगावला.