Ahmednagar Politics : येत्या १३ मे ला मतदान असल्याने प्रचार चांगलाच जोरावर आला आहे. दोन्ही बाजूचे उमेदवार मांदियानात उतरले असून कडाक्याच्या उन्हात प्रचार करतायेत. परंतु आता या लोसकभेच्या आखाड्यात महिलाही मागे नाहीत.
उमेदवारांच्या कारभारणी, कुटुंबीय व पक्षातील महिलाही आखाड्यात उतरल्या आहेत. यात आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे, शिर्डीतील उमेदवार स्वतः उत्कर्षा रूपवते यांनी प्रचाराचे मैदान चांगलेच गाजवले आहे.
उमेदवारांसोबत महिलांच्या प्रचार सभाही चांगल्याच गाजताना दिसत आहेत. अहमदनगर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या आतापर्यंत अनेक सभा झाल्या आहेत. लंके या स्वतः मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील, आई शालिनीताई विखे-पाटील या देखील स्वतंत्रपणे सभा घेत आहेत. अनेक सभांना त्या उपस्थित राहत आहेत. चौकसभा, कॉलनी सभेमध्ये त्या अपील करत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते याही स्वतः सभा घेत आहेत.
त्या आक्रमकपणे भाषण करत असून, सरकारवर टीका करत आहेत. त्यांची भाषणेही चांगलीच व्हायरल होत आहेत. लोणी खुर्दच्या ग्रामपंचायत सदस्या सरपंच प्रभावती घोगरे याही महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात याही सभांमधून महाविकास आघाडीची बाजू मांडत आहेत. महायुतीच्या प्रचारात पहिल्यापासूनच आमदार मोनिका राजळे या सभेत विकासाचे मुद्दे पटवून देत आहेत.
या महिलाही प्रचारात अग्रेसर संगमनेरमध्ये माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, श्रीगोंदा तालुक्यात अनुराधा नागवडे, प्रतिभा पाचपुते, पारनेर तालुक्यात सुवर्णा धाडगे, सुधामती कवाद, सोनाली सालके, अश्विनी थोरात यांचाही प्रचार, रॅली, बैठकांमधून सहभाग वाढला आहे.
भेटीगाठींवर भर
सध्या लगीनसराई होती, त्यामुळे लग्न सोहळे व घरगुती कार्यक्रम देखील होते. त्यामुळे नेते मंडळींना आवर्जून आमंत्रण दिले जाते. परंतु उमेदवार हे प्रचारात असल्याने या घर कारभारीणींनी ही बाजू सांभाळून घेतल्याचे दिसते. राणी लंके असतील की धनश्री विखे असतील या संबंधित कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.