Ahmednagar Politics : लोकसभा लागली आणि सुरु झाली रणधुमाळी. सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यात स्टार प्रचारकांनी अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. यात प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून आतापर्यंत जिल्ह्यात १८ स्टार प्रचारक येऊन गेले आहेत.
स्थानिक विकासाचे मुद्दे आणि स्थानिक राजकारणावर त्यांनी सडेतोड भाष्य करून आपलाच उमेदवार कसा सक्षम आहे, हे पटवून दिले आहे. आता अहमदनगरमध्ये हाय होल्टेज राजकीय वातावरण दिसेल. याचे कारण म्हणजे आता मोदी, शहा, योगी यांसारखे ११ दिग्गज प्रचारासाठी येणार आहेत.
आतापर्यंत कुणाचा झाल्या सभा?
महायुती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, पंकजा मुंडे यांनी प्रचार, रॅली, सभा घेतल्या आहेत. काहींनी रॅली काढली तर काहींनी सभा घेतल्या. विखे-पाटील हे स्थानिक असल्याने त्यांच्याच जिल्ह्यात सर्वाधिक सभा झाल्या आहेत.
महाविकास आघाडी
शरद पवार यांच्या आतापर्यंत राहुरी, शेवगाव, नगर अशा तीन ठिकाणी सभा झाल्या आहेत. बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार हे स्थानिक असल्याने त्यांच्याही गावोगावी सभांचा धडाका सुरू आहे. जयंत पाटील यांचा दौरा झाला आहे.
ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे यांनी राहाता व नगर येथील सभेत हजेरी लावली, तर खासदार संजय राऊत यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या
हे नेते येणार आता प्रचाराला
अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एक मेपासून प्रचाराचे वातावरण आणखी तापणार आहे. पहिल्याच आठवड्यात महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा होणार आहेत.
महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे. खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय आणखी काही स्टार प्रचारक शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरणार आहेत.