Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला अन अनेक राजकीय घडामोडींनी वातावरण तापू लागले. यात महत्वपूर्ण घडामोड झाली ती म्हणजे निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत खादारकीसाठी नशीब अजमावायचे ठरवले.
त्यांनी अजित पवार गटात असल्याने राजीनामा दिला आणि मग खासदारकी लढवण्यासाठी सज्ज झाले. अहमदनगरच्या इतिहासात आजवर असे करणारे लंके हेच एकमेव नाही. तर याआधीही तब्बल १४ आमदारांनी खासदारकीसाठी नशीब अजमवले आहे.
यामध्ये सहा लोकांनां यश मिळाले व ते खासदार झाले. यात शंकरराव काळे, बबनराव ढाकणे, प्रसाद तनपुरे, दादापाटील शेळके, तुकाराम गडाख, सदाशिव लोखंडे या सहा लोकांचा समावेश आहे.
– शंकरराव काळे : काळे हे पारनेर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेला आमदार म्हणून निवडून आले. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेतून ते काँग्रेसकडून उभे राहिले व भाजपचे वसंतराव गुंजाळ यांचा पराभव करत विजय मिळवला.
– बबनराव ढाकणे : तब्बल तीन वेळा पाथर्डी मतदारसंघातून ते आमदार झाले आहेत. अहमदनगर (दक्षिण) मतदारसंघातून १९८४ ला पराभव झाला. १९८९ ला बीड लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले व तेथे ते खासदार झाले.
– दादापाटील शेळके : शेळके हे जवळपास चार वेळा नगर-नेवासे मतदारसंघातून आमदार होते. १९९६ ला काँग्रेसकडून लोकसभेला उभे राहिले. शिवसेनेचे परवेझ दमानिया यांचा त्यांनी पराभव केला व खासदार झाले.
– प्रसाद तनपुरे : तनपुरे जवळपास २५ वर्षे राहुरीतून आमदार राहिले आहेत. १९९८ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिले व ते खासदार झाले.
– तुकाराम गडाख : १९९० ला गडाख हे शेवगावमधून प्रथम आमदार झाले. २००४ ला राष्ट्रवादीकडून दक्षिणेत लोकसभेला उभे राहिले व निवडून आले.
– सदाशिव लोखंडे : लोखंडे हे कर्जत मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २०१९ ला शिवसेनेकडून उभे राहिले व खासदार म्हणून निवडून आले.
लोकसभेला पराजित झालेले आमदार
एकनाथ निंबाळकर : कर्जतमधील काँग्रेसचे दोन वेळचे आमदार. १९८० ची काँग्रेस (यू) कडून लोकसभा लढवली व त्यात त्यांचा पराभव झाला.
पी. बी. कडू – राहुरी मतदारसंघातून आमदार. १९६७ ला उत्तरेतून अण्णासाहेब शिंदे यांनी पराभव केला तर १९७१ ला बाळासाहेब विखे यांनी पराभव केला.
गोविंदराव आदिक : श्रीरामपूरमधून दोनदा आमदार असले तरी १९९९ ला काँग्रेसकडून लोकसभा लढवताना ते अगदी तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
भानुदास मुरकुटे : श्रीरामपूरमधून तीन वेळा आमदार. २००४ ला शिवसेनेकडून लोकसभेला उभे राहिले पण पराभव झाला.
राजीव राजळे : २००४ ला पाथर्डी मतदारसंघातून काँग्रेसकडून उभे राहिले व आमदार झाले. २००९ ला अपक्ष व २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेला उभे राहिले व दोन्ही वेळेस पराभव झाला.
शिवाजी कर्डिले : नगर-नेवासे आणि राहुरी मतदारसंघ आदींमध्ये तब्बल पाच वेळा आमदार. त्यांनाही खासदारकीचा यश मिळाले नाही.
कुमार सप्तर्षी : १९७८ ला आमदार पण १९८९, १९९६ साली लोकसभेला पराभव.
संग्राम जगताप : नगर शहरातून दोनदा आमदार. २०१९ च्या लोकसभेला राष्ट्रवादीकडून रिंगणात. मात्र यात त्यांचा पराभव झाला.