विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : पारनेर, राहुरीत मतदानाचा टक्का कसाकाय वाढला रे भौ ? मतदारांचा उत्स्फूर्तपणा, छे छे लक्ष्मीदर्शन ? भौ मग फायदा विखेंना की लंकेंना ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : लोकसभेला काही म्हणा पण गम्मत आली. गम्मत नाही भौ लै मज्जा आली. पण काही म्हण फाईट अशीच व्हायला पाहिजे राव त्याच्याशिवाय मज्जा नाही. दोघे तगडे उमेदवार होते म्हणून भारी झालं.

सुजय दादांची तर गोष्टच न्यारी पण लंके भी लै भारी हे. ते सगळं खरय भौ पण मी काय म्हणतो पारनेर, राहुरीत मतदानाचा टक्का कसाकाय वाढला रे भौ? ते भी अचानक. पारनेर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७० टक्के मतदान झाले.

मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात पारनेरमध्ये ३, तर राहुरी तालुक्यात २ टक्क्यांची वाढ झाली. मला वाटतंय मतदारांचा उत्स्फूर्तपणा लै होता. का लक्ष्मीदर्शन झाले असेल?.. अशा काहीशा चर्चा सध्या कानावर ठिकठिकाणी पडू लागल्यात.

निकाल लागेपर्यंत लोक अशा चर्चा तर करणारच. पण विषय असा आहे की याचा या वाढत्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होणार? याच्याही अटकळी सध्या बांधल्या जात आहेत.

सहा विधानसभा मतदारसंघांपैकी श्रीगोंदा, कर्जत- जामखेड, पारनेर आणि राहुरी, नगर शहर या पाच मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यात सर्वाधिक मतदान राहुरी आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात झाले आहे. या दोन तालुक्यांतील वाढलेली मतदानाची टक्केवारी चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर तालुक्यांच्या तुलनेत राहुरी आणि पारनेरमध्ये २ ते ३ टक्क्यांनी अधिक मतदान झाले आहे. काही मतदान केंद्रांवर तर महापालिका, नगरपालिका, विधानसभा निवडणुकीपेक्षाही जास्तीचे मतदान झाले, असे काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. वाढलेल्या मतदान टक्केवारीचा कुणाला फायदा होणार? लंकेंना की विखेंना? याचा अंदाज बांधला जात आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके हे पारनेर तालुक्याचे नेतृत्व करतात. त्यांच्या पारनेर तालुक्यात मतदान कमी झाले, अशी चर्चा मतदानाच्या दिवशी सायंकाळपर्यंत होती. परंतु, अंतिम आकडेवारीत पारनेरने मतदानात जिल्ह्यात उच्चांक गाठला. सर्वाधिक ७०.१३ टक्के मतदान पारनेरमध्ये झाले.

राहुरी तालुक्यातही ७० टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राहुरीचे नेतृत्व करत असून, त्यांनीही मतदानासाठी चांगला जोर लावला होता. भाजपाचे माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचाही राहुरी विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांचा विखेंना की लंके यांना फायदा होणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

पारनेरमध्ये मतदानाच्या टक्केवारीवरून चर्चा
आमदार नीलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यात दिवसभर मतदानाची टक्केवारी इतर तालुक्यांच्या तुलनेत सुरवातीला आलेल्या आकडेवारीनुसार काहीशी कमी दिसली. त्यामुळे पारनेरमध्ये मतदानाचा टक्का घसरला अशी चर्चा व्हायला लागली.

या तालुक्यात सायंकाळपर्यंत ६३ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. परंतु, दुसऱ्या दिवशीच्या अंतिम आकडेवारीत पारनेरमध्ये सर्वाधिक ७०.१३ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर पुनश्च विविध चर्चांना उधाण आले.

Ahmednagarlive24 Office