Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी अखेर बाजी मारली आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांना अकोले व संगमनेर तालुक्याने तारल्याने ते विजयी झाले.
शिर्डी, कोपरगाव व श्रीरामपूरमध्ये सदाशिव लोखंडे यांनी मुसंडी मारली. मात्र, एकट्या अकोल्यानेच त्यांच्या स्थानिक असण्याऱ्या वाकचौरे यांना भरभक्कम आघाडी देत विजयी केले.
माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही संगमनेरमधून वाकचौरे यांची आघाडी अधिक भक्कम केळ्याचे दिसले. दरम्यान आता सदाशिव लोखंडे यांनी भाजप आणि काळे-कोल्हेंवर पराभवाचे खापर फोडले आहे. जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे माझा पराभव झाला असे ते म्हणाले आहेत.
जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे पराभव
खा. सदाशीव लोखंडे यांनी आपल्या पराभवाबाबत सांगताना असे म्हटले की, उत्तरेतील महायुतीच्या राजकीय नेत्यांमधील जिरवाजिरवीचे राजकारण नडले असून त्यामुळेच माझा पराभव झालाय. काळेंना कोल्हेंची आणि विखे-कोल्हेंना एकमेकांची जिरवयाची असल्याने माझीही जिरली व विखेंचीही जिरली असा आरोप केलाय.
विखे यांनी त्यांच्या मतदारसंघातून व आ. आशुतोष काळे, स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या मतदारसंघातून अकोला व संगमनेरच्या धर्तीवर मताधिक्य मिळाले असते तर माझा विजय नक्की झाला असता परंतु काळे-कोल्हे परिवारात एकमेकांची जिरवण्याच्या नादात माझी जिरली असल्याचे लोखंडे म्हणाले.
लोखंडे यांच्या पराभवाची काय असतील कारणे
उशिरा तिकीट जाहीर झाल्याने तालुक्यातील प्रमुख गावांमध्येदेखील प्रचारानिमित्त पोहोचले नाही. सदाशिव लोखंडे यांचे खासदार म्हणून दहा वर्षात कोणतेही पथदर्शी काम नाही अशी चर्चा होती. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचारात एकी दिसली नाही.
भाजप, अजित पवार राष्ट्रवादी व शिंदेसेना यांची स्वतंत्र प्रचार फेऱ्या, युतीच्या नेत्यांचे मनोमिलन झाले नाही. खासदार सदाशिव लोखंडे दहा वर्षांत तालुक्यातील गावागावात पोहोचले नाहीत. खासदार दिसले नाही ही भावना. सदाशिव लोखंडे व त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांविषयी नाराजी हा देखील महत्वाचा मुद्दा होता अशी चर्चा होती.