Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते. दरम्यान या प्रचार, बैठकांदरम्यान वाद, विवाद, रोष आदी गोष्टी देखील घडत आहेत. आता शिर्डी मतदार संघासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथे झालेल्या बैठकीत देखील दोन गटांत राडा झाल्याचे समोर आले आहे.
अधिक माहिती अशी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगावात लोखंडे यांच्या पुढील प्रचारार्थ कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अशुतोष काळे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी आपला खासदारकीचा उमेदवार कोण आहे, त्यांचा परिचय आम्हाला करून द्या, असे म्हणाल्यावर औताडे व सय्यद दोन गटात गोंधळ उडाला. मेहमूद सय्यद यांना मंत्री विखे, आशुतोष काळे, विजय वहाडणे यांनी खाली बसण्याचा सल्ला दिला. तसेच महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी
बैठकीत पुढील दहा दिवसांत प्रचाराचे नियोजन कशा पद्धतीने करायचे याच्या सूचना मंत्री विखे यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. ही बैठक संपल्यानंतर सर्वजण बाहेर पडत असताना काही कार्यकर्ते महेमूद सय्यद यांच्यावर धावून गेले.
यावेळी मोठमोठ्याने जय श्रीरामच्या घोषणा देखील उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. यामुळे मेहमूद सय्यद यांना तेथून जावे लागले. यावेळी बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे, कृष्णा आढाव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हे या बैठकीला देखील अनुपस्थित
महायुतीच्या नियोजित बैठकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे व त्यांच्या कार्यकर्त्यांची अनुउपस्थिती प्रकर्षाने जाणवली. निवडणुकीच्या कोणत्याही प्रचारात कोल्हे सक्रीय नसल्याने होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हेंच्या भूमिकेकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.
गोंधळ घालण्यासाठी पैसे दिले?
दरम्यान आता यावरून आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. मेहमूद सय्यद हा कधीही एका पक्षात राहिलेला नाही. विरोधी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा तो कार्यकर्ता आहे. विरोधकांनी त्यांना पैसे देऊन आमच्या कार्यक्रमात पाठवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी खडसावला आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी सांगितले तर खासदारांना दोन वेळेस निवडून आणण्यासाठी आम्ही होतो. मी लहान पणापासून एकाच पक्षात आहे. आमदार काळे यांच्याकडून निमंत्रण आल्यामुळे मी बैठकीला उपस्थित होतो असे मेहमूद सय्यद यांनी म्हटले आहे.