विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : सायंकाळी प्रचारतोफा थंडावणार ! स्थानिक नेत्यांच्या ‘व्होट बँके’ वर लंके-विखे, वाकचौरे-लोखंडेंची मदार, ‘असे’ आहे समीकरण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. शिर्डीतील तिरंगी लढतीतील सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वाकचौरे व उत्कर्षा रूपवते या प्रमुख उमेदवारांनी तर अहमदनगरमध्ये निलेश लंके व खा. सुजय विखे यांनी स्टार प्रचारकांच्या जोरावर अंतिम टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली खरी, मात्र आता प्रस्थापित स्थानिक नेते आपली ‘व्होट बँक’ कुणाला देतात, यावरच या उमेदवारांची मदार आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ १५ वर्षांपूर्वी आरक्षित झाल्यानंतर प्रस्थापित नेत्यांना आपल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या. मात्र, याच आरक्षणामुळे उदयास आलेल्या नेत्यांना याच प्रस्थापित नेत्यांच्या मदतीशिवाय निवडणूक लढविणेही शक्य नसते.

आरक्षित उमेदवार ऐन वेळी उमेदवारी मिळवतात आणि त्यांची सर्व मदार स्थानिक प्रस्थापित नेत्यांवर अवलंबून असते. त्यामुळे उमेदवारांची बरीचशी शक्ती या नेत्यांची नाराजी दूर करण्यात किंवा त्यांची मनधरणी करण्यात खर्च होते

राजकीय घराण्यांचा संभ्रम
यापूर्वी या मतदारसंघाची निवडणूक अहमदनगर मतदाररसंघाच्या आधी व्हायची, त्यामुळे नेत्यांना दोन्हीकडे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळत असे. यावेळी मात्र दोन्ही ठिकाणचे मतदान एकाच टप्प्यात आहे.

लोखंडे यांची जबाबदारी घेतलेले विखे मात्र पुत्र सुजय यांच्या निवडणुकीत गुंतले आहेत. लोणीची यंत्रणाही तिकडेच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून लोखंडे यांना कितपत न्याय मिळेल, हे सांगता येत नाही. शिवाय, कोपरगाचे कोल्हे कुटुंब व विखे यांच्यात वितुष्ट असल्याने तेही कितपत मदत करतील, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

श्रीरामपूरमध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे, अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक लोखंडे यांच्या, तर माजी नगराध्यक्ष करण ससाणे गट वाकचौरे यांच्या पाठीशी आहे

सहा आमदारांची फौज
लोखंडे व वाकचौरे यांच्या दिमतीला मतदारसंघातील सहा आमदारांची फौज उभी आहे. खासदार लोखंडे यांच्या बाजूने सध्या मंत्री राधाकृष्ण विखे, कोपरगावचे अशुतोष काळे आणि अकोल्याचे किरण लहामटे हे तीन आमदार आहेत. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे व शंकर गडाख यांचे वाकचौरेंना समर्थन देत असल्याचे चित्र आहे.

अहमदनगरमध्येही स्थानिक आमदार व नेत्यांवर मदार
अहमदनगरमध्येही आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. बबनराव पाचपुते यांचा विखे यांना समर्थन आहे तर आ. रोहित पवार, व अनेक स्थानिक नेत्यांचा लंके याना सपोर्ट आहे. आता हे नेते आपली स्थानिक व्होट बँक कुणाच्या मागे उभी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office