Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा थरार अगदीच क्लायमॅक्स कडे चालला की काय असे चित्र आता निर्माण झाले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आदी गोष्टी सध्या सुरु आहेत. खा. विखे यांनी लंके यांच्या शिक्षणावर तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपे एमआयडीसीमधील दहशत आदी गोष्टींवर घणाघात केले होते.
तर त्या टीकेला निलेश लंके यांनी देखील आपल्या शैलीत प्रतिउत्तर दिले होते. परंतु आता ही वाक्युद्धची लढाई आता कार्यकर्ता अगदी वैयक्तिक पातळीवर आणत आहे का असे चित्र निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे लंके समर्थक असणाऱ्या एकाने सुजय विखे यांना गोळ्या घालून संपवण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान ही ऑडिओ क्लिप खरी की खोटी याबाबत अनेक पैलू सध्या समोर येत आहेत.
प्रकरण काय ?
कामोठे येथे झालेल्या सभेत एक ऑडिओ क्लिप लावण्यात आली होती. ही क्लिप त्यानंतर सोशल मीडियावर अत्यंत वेगाने व्हायरल झाली होती. यामध्ये सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे ऐकू येते. यामध्ये शिव्या देणारा व्यक्ती माजी पंचायत समिती सदस्य असल्याचा दावा सध्या केला जात आहे. तसेच ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याचे सध्या म्हटले जात आहे.
ज्याच्यावर आरोप त्याचे स्पष्टीकरण
हा आरोप जो होतोय तो निवृत्ती (नाना) गाडगे यांच्यावर होत आहे. वरील आरोप त्यांच्यावर होऊ लागल्यानंतर त्यांनी मात्र यावर स्पष्टीकरण दिल आहे की, हे आरोप होत आहेत ते खोटे आहेत. माझा आणि राष्ट्रवादीचा, निलेश लंके प्रतिष्ठानचा कसलाही संबंध नाही. मी शिंदे गटाचा असून सामाजिक काम करत असतो. ज्यांनी हे ऑडिओ व्हायरल केले आहे ते खोटे आहे. जो माझ्यावर असे आरोप करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही गाडगे यांनी दिलाय.
सुसंकृत राजकारणात मिठाचा खडा
हा आरोप ज्या व्यक्तीवर होत आहे तो व्यक्ती हे आरोप नाकारत आहे. त्यामुळे गोळ्या घालण्याची धमकी त्या व्यक्तीने दिलीच नाही असे आपण समजू. पण ऑडिओ तर खोटी नाही. म्हणजे गोळ्या घालण्याची धमकी देणारा कुणीतरी आहेच की. अहमदनगरचे राजकारण हे सुसंस्कृत राजकारण म्हणून म्हटले जाते. जर असले गुंडागर्दीचे प्रकार वाढले तर सुसंस्कृत राजकारणात मिठाचा खडा असेल हे मात्र नक्की.