Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेसाठी एकीकडे खा. सुजय विखे व दुसरीकडे निलेश लंके यांनी आता सर्वकाही पिंजून काढायला सुरुवात केली आहे. जनमानसात जाणे, सभा घेणे आदी गोष्टींवर सध्या दोन्ही उमेदवारांनी धडाका लावला आहे. दरम्यान नुकतीच राहुरी येथे आ. निलेश लंके यांनी संवाद यात्रा पार पडली.
येथे आ. तनपुरे हे शरद पवार गटाचे आमदार असल्याने ते देखील यात दिसले. परंतु आता खा. सुजय विखे यांच्या राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील एका वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. आ. तनपुरे देखील लंकेंचे काम करणार नाहीत का असा सवाल सध्या सामान्य लोक या वक्तव्यामुळे एकमेकांना विचारू लागले आहेत.
काय म्हणाले सुजय विखे
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे खा. सुजय विखे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यांनी येथे निलेश लंके यांच्यावर तोफ डागली. विखे परिवाराला राहुरी समजायला ५० वर्षे लागली तर समोरच्या उमेदवाराची काय व्यथा असा सवाल त्यांनी केला. हे झाल्यावर ते म्हणाले की ते ज्यांच्यासोबत गाडीवर फिरत होते ते देखील त्यांचे काम करणार का हे आधी पाहणे महत्वाचे आहे. आता त्यांच्या या वक्तव्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.
लोक काय काढतायेत अर्थ
आता राहुरीतील संवाद मेळाव्यात निलेश लंके हे बऱ्याचदा आ. प्राजक्त तनपुरे यांच्या सोबत गाडीवर दिसले होते. त्यामुळे विखे यांच्या त्या वक्तव्याने त्यांचा इशारा तनपुरे यांच्याकडे होता का अशी चर्चा सध्या रंगली आहे.
तसेच मागील आमदारकीला विखे यांनी तनपुरे यांना मदत केली होती अशी एक चर्चा त्या काळात फार रंगली होती. अर्थात त्यात फार सत्यता होती अशातला भाग नाही. पण आता त्या चर्चांना या वक्तव्याशी जोडले जाऊ लागले आहे.