Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खा. सुजय विखे व निलेश लंके यांचे राजकीय युद्ध रंगले आहे. दोघेही मातब्बर आहेत. लंके यांना मदत करण्यासाठी शरद पवार नगरच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले.
दरम्यान ही राजकीय लढाई विखे व लंके यांच्यासोबत विखे व पवार अशी देखील आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज गटाची शरद पवार मोट बंधू शकतील का? या द्वारे ते लंके यांना विजयी करतील की खा. सुजय विखे गड राखतील? अशाच चर्चा सुरु झाल्या आहेत.
विखे विरोधक
अहमदनगरचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वीही राहिले. पण यात त्यांचे विरोधकही वाढत गेले. दक्षिण व उत्तरेतही त्यांना विरोध होतच गेला. बऱ्याचदा अनेक निवडणुकांत विखे विरोधात सगळे असेही वातावरण राहिले आहे. पण त्यावरही विखे यांनीच मात मिळवली आहे.
यंदा पाहिले तर युवा नेते विवेक कोल्हे व अजितदादा गटाचे आमदार लंके हे एकत्रितपणे विखे यांच्या विरोधात आवाज उठवत होते. यांच्या जोडीला त्यावेळी भाजप आमदार राम शिंदे हे देखील होते. तसेच इतरही अनेक विखे विरोधक लंके यांच्या व्यासपीठावर दिसत होते. आता ही विरोधकांची एकत्रित मोट बांधून विखे यांना परास्त करण्यासाठी शरद पवार हे चाल खेळू शकतात. त्यावर विखे कशा पद्धतीने कार्यवाही करतात ते पाहणे गरजेचेच ठरेल.
भाजपमधील विखेंविरोधकांची लंकेंना मोठी मदत मिळू शकेल असे म्हटले जात आहे. परंतु ही मदत मिळवणे हे लंके यांच्यासाठी सोपे नसेल. त्यांना यासाठी प्रचंड तारेवरची कसरत करावी लागेल. दरम्यान ही सगळी राजकीय गणिते विखे ओळखून आहेत व त्यानुसार विखे यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. यापूर्वीही अनेकदा विखे विरुद्ध इतर सर्व असे राजकारण रंगलेले पाहायला मिळाले पण त्यावेळीही सर्वाना विखे यांनी मात दिलेली पाहायला मिळाले.
आमदारांची ताकद कुणाकडे ?
दक्षिणेत महायुतीकडे शेवगाव पाथर्डी, नगर शहर आणि श्रीगोंदा असे तीन आमदार व महाविकास आघाडीकडे पारनेर, कर्जत-जामखेड आणि राहुरी असे तीन आमदार असे संख्याबळ दिसते. पारनेरचे आमदार नीलेश लंके हे लोकसभा लढवत असल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे भाग वेगळा.
विखेंचे पक्षात व अहमदनगरमधेही वजन वाढले
महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांची पक्षामध्ये प्रचंड ताकद वाढलेली दिसते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विखे पिता-पुत्रांनी आमचा पराभव केला असा तक्रारीचा पाढा पक्षाच्या पाच पराभूत आमदारांनी केला होता.
परंतु असे असले तरी विखे यांचे पक्षातील वजन वाढत गेले व आज जर पाहिले तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला भेटण्यासाठी देखील विखे यांना राज्यातील भाजप नेत्यांची गरज पडत नाही. काळाच्या ओघात त्यांचे अहमदनगर जिल्ह्यातही वजन वाढलेले दिसते. नगर शहर व केडगाव या दोन ठिकाणी विखे यांचे मोठे वर्चस्व आहे व ते मान्य करावेच लागेल असे लोकही सांगतात.