विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : तब्बल १२ वर्षांनंतर केडगावचे ‘कोतकर’ राजकारणात सक्रिय ! विखेंसाठी कंबर कसली, पण परिणाम काय होणार? राजकीय समीकरणे कशा पद्धतीने बदलणार? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : यंदाच्या लोकसभेने सगळीच गणिते बदलून टाकली आहेत. अहमदनगर लोकसभेसाठी तर जी राजकीय धुळवड उडाली आहे ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. जे एकेकाळचे कट्टर विरोधक होते ते आता एकमेकांच्या गळ्यातगळे घालून फिरत आहेत.

एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. दरम्यान या निमित्ताने अहमदनगरच्या राजकारणातील महत्वाचे असणारे केडगाव उपनगर हे देखील चर्चेत आले ते म्हणजे बदलत्या राजकीय समीकरणांमुळे.

राजकारणापासून तब्बल १२ वर्ष दूर राहिल्यानंतर २५ वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या केडगावमध्ये आता कोतकर गटाने भाजपचा झेंडा हाती घेत सुजय विखे पाटील यांच्यासाठी मैदानात दंड थोपटले आहेत. मागील वेळी जे विरोधात होते तेच आता सोबत काम करताना दिसत आहेत.

कोतकर यांच्या सक्रियतेने केडगावमधील राजकीय समीकरणे बदलली
लोकसभा निवडणुकीनिमित्त केडगावमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मागील वेळी कोतकर यांच्या गैरहजेरीत जे विखे यांच्यासाठी मैदानात उतरले होते ते आता त्यांच्या विरोधात प्रचार करीत आहेत. तर जे विखे यांच्या विरोधात प्रचार करीत होते, त्यांनी आज विखे यांचा झेंडा हाती घेतला आहे.

उद्योजक सचिन कोतकर यांनी केडगावमध्ये ‘होम टू होम’ प्रचार सुरू केला आहे. सभा, बैठकांच्या माध्यमातून कोतकर गटाने राजकारणात पुन्हा सक्रियता दाखविली आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मतदारांशी संवाद साधला आहे.

विखे यांनीही जसे प्रेम कोतकर परिवारावर करता तसेच प्रेम विखे परिवारावर करा, अशी भावनिक साद घातली. माजी महापौर संदीप कोतकर यांनी विखे यांना आमच्या केडगावचे विकासासाठी पालकत्व स्वीकारा, अशी गळ घातली.

लंके यांच्यासाठीही विरोधक मैदानात
विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारात ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिसत आहेत.
कोतकर यांचे काही पारंपरिक विरोधकही लंके यांच्या प्रचारात आहेत.

पारनेर तालुक्यातील अनेक नागरिक केडगावात स्थायिक आहेत. त्याचा फायदाही लंके यांना होऊ शकतो. शिंदेसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते हे महायुतीमध्ये असल्याने ते प्रचारात सक्रिय दिसत नाहीत असे बोलले जाते. पण असेअसले तरी त्यांचे समर्थक मात्र लंके यांच्या मागे ताकद उभी करीत असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.

काय होईल राजकीय परिणाम ?
एकीकडे विखे यांना मताधिक्य देण्यासाठी कोतकर गटाने प्रभावी यंत्रणा उभारली आहे. तर हे मताधिक्य मिळू नये यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. म्हणजेच लंके यांना कोतकर विरोधकांचा पाठिंबा मिळत आहे. म्हणजेच येथे ही निवडणूक वाटते तितकी एकहाती होईल असे दिसत नाही.

एकीकडे कोतकर यांचा केडगावच्या राजकारणात असलेला दबदबा, कार्यकर्त्यांशी जोडलेली गेलेली नाळ हे विखे यांना फायदेशीर ठरेल पण त्याच बरोबर लंके यांच्या पाठीशी विरोधक उभे राहिल्याने त्यांनाही मदत होईल. त्यामुळे आता येत्या ४ जून लाच सर्व राजकीय परिणाम समोर दिसतील.

Ahmednagarlive24 Office