Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात काल (१० मे) प्रचार सभेचा मोठा धुराळा उडाला. आज शेवटचा दिवस असल्याने काल व आज मोठी रणधुमाळी आहे. काल अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
एकीकडे हा पाऊस होता तर दुसरीकडे दिग्गज नेते बरसत होते. बाळासाहेब थोरात असतील कि पंकजा मुंडे, अजित दादा असतील की सुप्रिया सुळे. सर्वांनीच मैदान गाजवले. यात विशेष गाजले ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व सुप्रिया सुळे यांची सभा.
अजित दादा म्हणाले, कोणाला मोका लावायचा, कोणाला तडीपार करायचे हे ठरवू..
महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केला आहे. नीलेश लंके ‘तू किस झाड की पत्ती है, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे महायुतीच्या प्रचार सभेत केले. येथील बाजार तळावर झालेल्या या सभेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चित्रा वाघ उपस्थित होते.
पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मला इथे आल्यानंतर कळाले की महायुतीच्या कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना त्रास दिला जातो. बेट्या पोलिसांचा बाप काढतो का, असे म्हणत ‘नीलेश लंके तू ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे.
माझ्या नादाला लागू नकोस. महाराष्ट्रात माझ्या नादाला कुणी लागत नाही. जे नादाला लागले, त्यांचा पुरता बंदोबस्त केला आहे’, असे विधान पवार यांनी केले. आचारसंहिता संपल्यानंतर या तालुक्यातील कोणाला मोका लावायचा, कोणाला तडीपार करायचे हे ठरवू, अचरसंहिता संपताच दमबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत.
सुप्रिया सुळेंचे चॅलेंज, ताकदवानांशी लढून दाखवा..
पारनेरच्या सभेत नीलेश लंके यांना दमदाटी केली गेली. नीलेश लंके यांना केलेली दमदाटी हा सुसंस्कृत महाराष्ट्र खपवून घेणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर गरिबांना दमदाटी करण्यापेक्षा ताकदवान लोकांशी लहून दाखवा. जसे लंके लढताहेत.
आम्ही लढतोय, असे प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पारनेर तालुक्यात ढवळपुरी येथील सभेत अजित पवारांना दिले. सुळे म्हणाल्या, व्यासपीठावर चव्हाण साहेबांचा फोटो लावता व भाषणात दमदाटी करता. प्रेमाने बोला आदर करू, पण तुमची दमदाटी हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही.
आम्ही संसदेत डंके की चोटपर लढतो. तुमच्यात हिंमत असेल तर जे ताकदवान आहेत त्यांच्याशी लढून दाखवा. अजित पवार यांच्या विधानावर सक्षणा सलगर यांनीही सभेत टीका केली. त्या म्हणाल्या, अजित पवार जी भाषा वापरत आहेत ती योग्य नाही. लंके गुंड नव्हेत. अजित पवार गुंडांचा प्रचार करत आहेत असे त्या म्हणाल्या.
थोरातांनी ‘महानंद’ वरून विखेंना घेरले
मोदी- शाहांनी देशात सर्वाधिक नुकसान महाराष्ट्र राज्याचे केले. महानंद डेअरी गुजरातला देण्याचे पाप दुग्धविकास मंत्र्यांचे आहे, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. तिसगाव (ता. पाथर्डी) येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, ग्रामीण बोलीभाषा, तेथील वेदना जाणणारा नेता हवा. कोणती भाषा त्याला येत नाही हा मुद्दा निरर्थक आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकणारा इतिहासाला मान्य नाही.
वर्तमानातही ती परंपरा लंके यांच्या रूपाने जपायची आहे. दूध, कांदा दराच्या दुपटीने पूरक खते, पशु-खाद्याचे दर झाले आहेत. शेतकऱ्यांची ही क्रूर थट्टा आहे, अशी टीका त्यांनी केली.
पंकजा ताईंचा ‘मराठा’ विषय..
मी स्वतः कितीही संकटात असेल. माझ्या जिल्ह्यात जातीयवादाचे विषारी राजकारण होत असले तरीही आम्ही कधी जातपात मानली नाही. आमच्यात गोपीनाथ मुंडे यांच्या रक्त्ताचे गुण आहेत. एका मराठा बांधवाला विजयी करण्यासाठी जीव मुठीत धरून येथे सभेला आले.
हे माझ्या जिल्ह्यातील लोकांनी पाहावे, असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पाथर्डी येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.