Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच गरमागरम झाले आहे. महायुतीचे लोखंडे-विखे, महाविकास आघाडीचे वाकचौरे-लंके असे उमेदवार असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी सुरु आहे. आपलाच पक्ष किती श्रेष्ठ हे देखील हे लोक पटवून देत आहेत.
पण तस जर पाहिले तर उमेदवारांनी आपल्या विरोधातील पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे असे लोक म्हणतात. ज्या पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर आपण टीका करतो त्याच घरात काही काळ आपण देखील सत्तेचा उपयोग घेतला, हे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार विसरले आहेत का? असा सवाल आता नागरिकांनाच पडू लागला आहे.
नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीतील प्रमुख चारही उमेदवारांना पक्ष बदलाचा दांडगा अनुभव आहे. ज्या पक्षातून आपण आता सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेलो तोच मागच्या पक्ष किती वाईट हे सांगण्याची धडपड काही उमेदवार करतायेत का असे प्रश्नही पडतो.
वारंवार पक्ष बदलाच्या अनुभवानंतर आता विकासाच्या नावाखाली सत्तेची ऊब कायम ठेवण्यासाठी पुन्हा नव्याने येणाऱ्या सत्ताधारी पक्षात कोलांटउड्या मारणार नाही याची हमी हे उमेदवार देतील का असाही सवाल सुज्ञ मतदार करत आहे. जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांवर नजर टाकली तरी त्यांचा पक्ष बदलाचा इतिहास समोर येतो.
या सर्वांना वारंवार पक्ष बदलाचा मोठा इतिहास असल्याचे दिसते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीकडून डॉ. सुजय विखे (भाजप) आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (शिवसेना एकनाथ शिंदे गट) तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) समोरासमोर एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले आहेत. पाहुयात या उमेदवारांचा पक्ष बदलाचा इतिहास.
विखे पाटील : काँग्रेस-भाजपा असा प्रवास. बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे, शालिनीताई विखे यांनी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-भाजपा असा दीर्घ पक्षीय प्रवास केला असून विशेष म्हणजे या सर्वच पक्षात त्यांना मानाची स्थाने आहेत.
निलेश लंके : शिवसेना-राष्ट्रवादी-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) असा त्यांचा प्रवास राहिला.
सदाशिव लोखंडे : विद्यमान खासदार लोखंडे यांचा प्रवास म्हणजे कर्जत-जामखेडचे भाजपकडून आमदार असलेल्या लोखंडे यांनी भाजप-मनसे-शिवसेना आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) असा राजकीय प्रवास केला.
भाऊसाहेब वाकचौरे : मतदार संघाच्या पुनर्रचनानंतर शिवसेनेने त्यांना संधी दिली आणि ते खासदार झाले. शिवसेना, काँग्रेस पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा वाकचौरे यांचादेखील राजकीय प्रवास आहे.