Ahmednagar Politics : अहमदनगरच्या शरद पवार गटाच्या विजयाने आता अहमदनगर मधील राजकीय गणिते आता बदलतील असे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर होणार की आघाडी, महायुती करूनच होणार? यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील फुटीमुळे कार्यकर्ते विभागले होते. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा करिष्मा दिसला नाही. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते तसेच नेते शरद पवारांकडे परत येतील असा अंदाज बांधला जात आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवारांचा दबदबा असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले. त्यामुळे अजितदादांकडे गेलेले अनेक कार्यकर्ते माघारी परतू शकतील असा कयास बांधला जात आहे.
अहमदनगरमध्ये पवारांची जादू
फोडाफोडीचे राजकारण, नवीन चिन्ह आणि नवखी अभ्यासू अशी संमिश्र प्रचार यंत्रणा, यावर मदार ठेवीत नव्या जुन्यांचा मेळ घालीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी एकसंध राहात कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातून नीलेश लंके यांना आघाडी देत गड राखण्यात यश मिळविले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि नगरमधून भाजपच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव जाहीर झाले. त्यांनी भाजप, अजित पवार गट राष्ट्रवादी, रिपाइं (आठवले), मनसेसह मित्रपक्ष बरोबर घेत प्रचाराची राळ उडविली. परंतु केंद्र व राज्य सरकारची कार्यपद्धती, फोडाफोडीचे राजकारण, सरकारी यंत्रणांचा गैरवापर आदी त्यांच्यावर झालेले आरोप नकारात्मकता पेरत गेले.
तुलनेत उमेदवारी जाहीर होताच जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांना समवेत घेत सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत कर्जत- जामखेड मतदारसंघ नीलेश लंके यांनी पिंजून काढला.
सर्व सामान्य जनतेतून सहानुभूती वाढत जात पेंशनर, शेतकरी, शेत मजूर, गृहिणी एवढेच काय मुलांनी खाऊचे पैसे निवडणुकी खर्चासाठी मदत म्हणून दिले. त्याचाही हातभार मताधिक्य वाढण्यास लागला. हे सांगण्याचा, उहापोह करण्याचा उद्देश इतकाच की लोकप्रियता जितकी लंके यांची होती तितकीच ती पवार यांच्या प्रति होती. ठाकरे यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतींविषयी होती असे म्हटले जाते.
पक्षांतराचा ट्रेंड
डॉ. सुजय यांच्या प्रचारासाठी जामखेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्जतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा झाल्या, मात्र झालेली गर्दी मतात परिवर्तित झाली नाही. याउलट जयंत पाटील, शरद पवार, सुषमा अंधारे आदींसह आमदार रोहित पवार यांच्या सभांना विक्रमी गर्दी झाली.
त्याची प्रचिती निकालात आली. म्हणजेच जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवारांचा दबदबा असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले. त्यामुळे अजितदादांकडे गेलेले अनेक कार्यकर्ते माघारी परतू शकतील असा कयास बांधला जात आहे.