Ahmednagar Politics : सर्वांनाच ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे अशा अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीला अवघे चार दिवस राहिले आहेत. येत्या ४ जूनला एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे.
अहमदनगरची निवडणूक महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरली. त्यासोबतच शिर्डीकडेही लोकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी आहे त्या परिसरात मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. तसेच वायरलेस सेटदेखील वापरता येणार नाही.
यासंदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मतमोजणी प्रक्रिया उमेदवारांची मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक करण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.
‘अशी’ असेल व्यवस्था
४ जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी ७६८ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही विधानसभा मतदारसंघनिहाय होईल व नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ९६ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
असे एकूण १९२ टेबल असणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल असणार आहेत. यामध्ये पोस्टल मतांसाठी दोन टेबल, तर ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल असणार आहेत. एका टेबलवर ४ कर्मचारी असतील. यामध्ये पर्यवेक्षक, सहायक, मायक्रो ऑब्झर्व्हर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहेत.
परिसरात मोबाइल, लॅपटॉपला बंदी
निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, वरखार महामंडळाच्या गोदामापासून काही मीटर परिसरात मोबाइल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यास बंदी घालण्यात आली आहे.
निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाच्या उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाशिवाय व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सदरील आदेश निवडणुकीची कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४ जून रोजी सकाळी ६:०० वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अमलात राहील.
मजमोजणी परिसरात कलम १४४ लागू
भारतीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. यासाठी मजमोजणी परिसरात कलम १४४ लागू असणार आहे