Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेत बारामती प्रमाणेच भाजप विरोधात शरद पवार अशी लढत पणाला लागली आहे. येथे विखे विरोधात लंके अशी तगडी फाईट होणार असून येथे भाजप महाविकास आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
आता आपापल्या उमेदवारांसाठी पक्षातील दिग्गज नेते, स्टार प्रचारक सभा घेणार आहेत. सोमवारपासून अहमदनगरमध्ये सभांचा धुराळा उडणार आहे. सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी व नगर शहरात सभा घेणार आहेत.
तर मंगळवारी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेणार आहेत. नगर लोकसभा मतदारसंघात विखेंसाठी पंतप्रधान मोदींसह आठ , तर लंकेंसाठी पाच स्टार प्रचारक प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत.
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी पंतप्रधान मोदी मंगळवारी (७ मे) नगर शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरातील सावेडीतील संत निरंकारी भवन मैदानात दुपारी चार वाजता सभा होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी, ५ मे ला महाविकास आघाडीचे उमेदवार लंके
यांच्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांची बेलवंडी व नगर शहरात सभा होणार आहे. लंके यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्या सभा होणार आहेत. विखे यांच्यासाठी ८ मे ला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह राहुरी, श्रीरामपूर येथे सभा होणार आहे.
९ मे ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड व कोपरगाव येथे प्रचार सभा होणार आहे. याच दिवशी ९ मे ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जत व जामखेड येथे सभा, तर आमदार नितेश राणे यांची पाथर्डी येथे रॅली व शेवगाव येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची १० मे ला श्रीगोंदे येथे सभा होणार आहे. ११ मे ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नगर शहरात सभा होणार आहे.