Ahmednagar Politics : सध्या निवडणुकीचा चांगलाच रंग चढला आहे. सगळीकडे एकदम धामधूम असून भर उन्हात घामाच्या धारात भिजत उमेदवारांसह कार्यकर्ते सध्या फिरताना दिसत आहेत. परंतु हेच उमेदवार किंवा खासदार यांना इतर वेळी जनतेत जायला, त्यांचे दुःख समजावून घ्यायला वेळ मिळत नाही ही वस्तुस्थिती काही घटनांवरून समोर येतीये.
असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या मुळा खोऱ्यातील दुर्गम आदिवासी भागात देखील आहे. याठिकाणी अजूनही खासदार अथवा इतरही उमेदवार पोहोचले नाहीत.
येथील ग्रामस्थांना ना खासदार माहीत, ना उमेदवार. त्यामुळे ते ज्या चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत, ते चिन्हही मतदारांपर्यंत पोहोचलेले नसल्याचे वास्तव आहे.
आदिवासी दुर्गम भागातील अनेक गावांत मोठ्या समस्या आहेत. परंतु येथे खासदार किंवा इतर उमेदवार फिरकत नाहीत. उमेदवार आले तरी अर्धा तास गावात थांबून निघून जातात. पुन्हा वर्षे वर्षे ते फिरकत नाहीत. स्थानिक आमदार व स्थानिक नेते संपर्कात असतात. मात्र खासदारांना गावांशी संपर्क ठेवणे महत्त्वाचे वाटत नाही का? असा प्रश्न अनेक नागरिक करतायेत.
पहाटे पाचला उठायचे अन पुण्याला निघायचे, काम करून पुन्हा घरी यायचे..
आजही पावसाळ्यात भात लागवडी उरकल्या की, रोजगारासाठी घरातील बाया-बापड्यांना बाहेर जावे लागते. भात सोंगणीला म्हणजे दिवाळीला घरी यायचे. काही लोकांची तर पोटासाठी वेगळीच धडपड सुरु आहे.
दररोज पहाटे पाच वाजता भाड्याच्या गाडीने पुणे जिल्ह्यातील ओतूरला जातात. तेथे चार वाजेपर्यंत काम करतात आणि पुन्हा त्याच गाडीने सात वाजेपर्यंत घरी येतात अशी तारेवरची कसरत सध्या सुरु आहे.
इतरही अनेक समस्या
अनेक रस्ते खराब असून गावात बसेस वेळेवर येत नाहीत. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. कुमशेत, हरिश्चंद्रगड परिसरात पर्यटन विकासाला गती मिळत नाही जे तसे झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे येथील स्थानिक तरुण सांगतात.
उपबाजार समिती नसल्याने शेतमाल विकण्यासाठी ६० किलोमीटरची फरफट
काही गावांतील शेतकरी भाजीपाल्याची पिके घेतात. मात्र, हा भाजीपाला विक्री करण्यासाठी जवळपास उपबाजार समिती नाही. त्यामुळे तो विकण्यासाठी ४० किलोमीटर अंतरावरील अकोले किंवा ६० किलोमीटर अंतरावरील घोटी (जि. नाशिक) येथे जावे लागते. राजूर या ठिकाणी उपबाजार समिती झाल्यास सोयीचे होईल. स्थानिक शेतकऱ्यांची धावपळ होणार नाही, असे गंगाराम धिंदले यांनी सांगितले