नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांवर भाजप-शिवसेना यांचाच झेंडा फडकणार, कारण की….

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने अजूनही सर्वच जागांवर आपला अधिकृत उमेदवार उतरवलेला नाही. काही जागांवरील उमेदवार मात्र महायुतीने आणि महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहेत. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी राज्यातील आपले बाकी राहिलेले उमेदवार देखील लवकरात लवकर जाहीर करणार आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथील लढत आता स्पष्ट झाली आहे. नगर दक्षिण मधून यावेळी महायुतीने भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संधी दिलेली आहे. दुसरीकडे या जागेवरून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने उमेदवार दिलेला आहे.

शरद पवार गटाने या जागेवरून पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना संधी दिलेली आहे. खरेतर निलेश लंके हे अजितदादा यांच्या गटात होते. मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची महत्त्वकांक्षा बाळगून त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश घेतला असून हाती तुतारी घेत सुजय विखे यांना आव्हान दिले आहे. विशेष बाब म्हणजे निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदार संघात प्रचाराला सुरुवात केली आहे.

ते पायाला भिंगरी बांधत मतदार संघाचा दौरा करत आहेत. दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे. आज अर्थातच 7 एप्रिलला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील कामोठे येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील अर्थातच पारनेर मधील हजारो लोक कामोठे येथे नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने वास्तव्याला आहेत.

हेच कारण आहे की त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पारनेरचे मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुजय विखे पाटील यांनी केलेला आहे. विखे पाटील यांना दुसऱ्यांदा खासदार बनवण्यासाठी महायुती मधील इतर मित्र पक्षांनी देखील शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी मधील निलेश लंके हे स्वतः जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदार संघात आपला संपर्क वाढवत आहेत.

ते जोरदार प्रचाराला लागले आहेत. मात्र, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. निलेश लंके यांचे भारतीय जनता पक्षातील विधानपरिषद आमदार राम शिंदे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, या दोघांच्या फ्रेंडशिपच्या चर्चा संपूर्ण नगरच्या राजकीय वर्तुळात फेमस आहेत. दरम्यान याच फ्रेंडशिप मुळे कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा निलेश लंके यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

जर हे खरे असेल तर याचा लंके यांना मोठा फटका बसणार यात शंकाच नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीमधील ठाकरे गट नगर जिल्ह्यात सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरू असतानाही शांत बसला आहे. यामुळे लंके यांच्या दक्षिण स्वारीसाठी ठाकरेची रसद मिळत नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. वास्तविक नगर जिल्ह्यात ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दमदार सैनिक आहेत. विशेष म्हणजे यंदा कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेबाहेर काढायचे असा चंग ठाकरे गटाने बांधलेला आहे.

उद्धव ठाकरे यांनी देखील हाती मशाल घेत ‘अबकी बार तडीपार सरकार’ असे म्हणत भाजपा विरुद्ध जोरदार शंखनाद केला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांचे नगर जिल्ह्यातील कार्यकर्ते अजूनही शांत असल्याने नेमके कार्यकर्त्यांच्या मनात आणि ठाकरे यांच्या मनात काय सुरु आहे, नगर जिल्ह्यात त्यांचा पाठिंबा कोणाला आहे असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आमदार शंकर गडाख, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, संदेश कार्ले हे ठाकरे गटाचे नगर जिल्ह्यातील दिग्गज मंडळी अजूनही लंके यांच्या प्रचाराला मैदानात उतरली नसल्याचे चित्र असून यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकीकडे महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि शरद पवार गटाने आपल्या अधिकृत उमेदवारासाठी ग्राउंड तयार करायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे ठाकरे गट अजूनही शांत आहे. यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे संशयास्पद नजरेने पाहिले जात आहे. त्यांची ही शांतता सुजय विखे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा तर देणारी नाही ना ? अशा प्रकारच्या चर्चाना आता उधान आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाने दिलेला उमेदवार अर्थातच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि नगर दक्षिण मधील निलेश लंके यांनी ठाकरे गटाच्या नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांशी अजून संपर्कच साधलेला नाही असे बोलले जात आहे.

हेच कारण आहे की सध्या स्थितीला नगर दक्षिण मध्ये सुजय विखे पाटील व महायुती आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतय. प्रचाराच्या मोर्चावर महायुती महाविकास आघाडीपेक्षा सध्यातरी वरचढ असल्याचे भासत आहे. नगर जिल्ह्यात ठाकरे गटाची मोठी ताकद असल्याचा दावा होत आहे. मात्र ठाकरे गट अजूनही सक्रिय झालेला नसल्याने यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार विजयी होणार असा विश्वास महायुतीच्या मित्र पक्षांकडून व्यक्त होऊ लागला आहे. नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांवर भाजप-शिवसेना यांचाच झेंडा फडकणार असा दावा महायुती मधील नेत्यांनी केला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे उमेदवार अर्थातच विद्यमान खासदार लोखंडे आणि नगर दक्षिण मधून भाजपाचा उमेदवार अर्थातच डॉक्टर सुजय विखे पाटील हेच विजयी होतील अशी भविष्यवाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे. नगर दक्षिणचे सध्याचे चित्र पाहता राजकीय विश्लेषक देखील विखे पाटील यांचेच पारडे जड भासत असल्याचे म्हणत आहेत. तथापि आता ठाकरे गट महाविकास आघाडीचा धर्म जोपासत आपल्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार की नाही? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. परंतु आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या दिग्गज नेत्यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ तयारी सुरू केली नसल्याने भाजपा प्रणित महायुतीने नगर जिल्ह्यात थोडीशी आघाडी घेतलेली आहे असंच म्हणावं लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe