विधानसभा निवडणूक

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार, एमआयएम आपला उमेदवार उतरवणार, कोणाला मिळणार संधी ?

Published by
Tejas B Shelar

Ahmednagar Politics News : अहमदनगर मधून आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाने उमेदवार दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाने या जागेवर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिलेला आहे.

शरद पवार गटाने या जागेवरून पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेत लोकसभेची निवडणूक आधीच रंगतदार बनवलेली आहे. अशातच आता नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत एमआयएम सुद्धा आपला उमेदवार उभा करणार आहे. यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्या या आमने-सामनेच्या लढतीत तिसऱ्याची एन्ट्री होणार आहे. एमआयएम पक्षाने नगर दक्षिणमधून जर उमेदवार दिला तर या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. यामुळे निवडणूक अजूनच काटेदार होण्याची शक्यता आहे.

एमआयएम नगर दक्षिणमध्ये कोणाला संधी देणार

एमआयएम नगर दक्षिणमधून आपला उमेदवार देणार आहे. यामुळे, ही लढत आता आणखी टफफाईट होण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभेच्या काही जागांवर एमआयएम उमेदवार देणार आहे. याची घोषणा प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या अनुषंगाने एमआयएम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी व पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांची भेट घेतली आहे. यात अहमदनगर दक्षिण बाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची सविस्तर माहिती देऊन पक्ष कसे निवडणूक रिंगणात आपले उमेदवार देऊ शकतात यावर या भेटीत सविस्तर चर्चा झाली आहे.

परवेज यांनी विकासाचा औरंगाबाद पॅटर्न नगरमध्ये राबवण्याची गरज असल्याचे यावेळी म्हटले आहे. दरम्यान नगर मध्ये उमेदवार उतरवण्याबाबतचा निर्णय खासदार इम्तियाज जलील व डॉ गफ्फार कादरी अहमदनगर दक्षिण बाबत राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदउद्दीन ओवेसी यांच्या बरोबर चर्चा करून घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मात्र, खासदार जलील यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दक्षिण मध्ये कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे नगर दक्षिण मध्ये एमआयएम उमेदवार उतरवणार हे स्पष्ट होत आहे. पण या जागेवरून एमआयएम कोणता उमेदवार उतरवणार याकडे नगर मधील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष राहणार आहे.

डॉ. सुजय विखे यांचे पारडे जड !

सध्या महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि संपूर्ण महायुती मधील मित्र पक्षांनी सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा विजयी बनवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सुजय विखे पाटील आणि त्यांचे वडील, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली स्पेशल यंत्रणा देखील निवडणुकीच्या कामाला लावलेली आहे.

राजकीय विश्लेषकांनी या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे पारडे थोडेसे जड असल्याचे म्हटले आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच वर्षात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना सुजय विखे पाटील यांनी पूर्ण करून दाखवले आहे. त्यामुळे या कामाचे भांडवल विखे पाटील यांना विजयी बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
शिवाय विखे घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांची देखील संख्या खूपच अधिक आहे.

यामुळे निवडणुकीत हा देखील फॅक्टर मोठी मोलाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत एकेकाळी धूरविरोधी असणारे महाराष्ट्रातील तीन ताकतवर नेते सुजय विखे यांच्यासाठी प्रचार करणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आता एकत्रित असून यांचा फायदा सुजय विखे पाटील यांना होणार आहे.

शिवाय विखे पाटील यांनी पक्षांतर्गत असणारी नाराजी देखील आता बऱ्यापैकी दूर केली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विखे पाटील यांनी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांच्याशी जवळीक वाढवली आहे. दुसरीकडे माजी आमदार निलेश लंके यांच्यावर शरद पवार यांचे नातू अन कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा थोडेसे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

लंके आणि विधान परिषद आमदार राम शिंदे यांची फ्रेंडशिप रोहित दादांना आवडत नसल्याचे सांगितले जात असून यामुळे लंके यांच्या कार्यक्रमापासून रोहित दादा थोडेसे लांब राहत असल्याचे म्हटले जात आहे. जर असे असेल तर साहजिकच कर्जत जामखेड मध्ये निलेश लंके यांची पकड खूपच ढील्ली होणार आहे आणि या ठिकाणी सुजय विखे पाटील यांना फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मोदी मॅजिक पुन्हा एकदा विखे यांच्या कामी येऊ शकते.

दरम्यान या साऱ्या गोष्टी सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा विजय मिळवून देऊ शकतात असा दावा नगरच्या काही राजकीय विश्लेषकांनी केलेला आहे. दुसरीकडे निलेश लंके यांचा मार्ग काहीसा खडतर असल्याचे बोलले जात आहे. आता एमआयएम पक्ष देखील आपला उमेदवार या ठिकाणी देणार आहे, यामुळे याचा देखील निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि, एमआयएमच्या उमेदवारामुळे कोणाचे नुकसान होणार हे तर निकालानंतरच समजू शकणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com