Ahmednagar Politics News : अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखतात. याचे कारण म्हणजे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे 2024 लोकसभा निवडणुकीची अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना प्रवरा येथे सुरू केला होता. तेव्हापासून नगरची सहकार क्षेत्रात वाटचाल सुरू झाली आणि आज सहकार क्षेत्रात नगरला डावलून चालणार नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे.
नगरला पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखतात. कारण की नगरच्या पुढे पश्चिम महाराष्ट्राला सुरुवात होते. नगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ येतात. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. यंदा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर होणार आहे.
नगर दक्षिण मध्ये महायुतीचे सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात लढत होणार आहे. दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडी कडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या लढत होणार आहे.
सध्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार करत आहे. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा नगरच्या राजकीय गणगोतांचा विषय ऐरणीवर आला आहे.
नगरला राजकीय गणगोतांचा जिल्हा म्हणतात याचे कारण म्हणजे जिल्ह्यातील अनेक नेते एकमेकांचे सगेसोयरे आहेत अन ते वेगवेगळ्या पक्षात आहेत. यामुळे पक्षाची भूमिका काहीही असली तरी देखील हे सगेसोयरे आपली सोयरीक सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे आता आपण नगरमधील राजकीय नेते आणि त्यांचे गणगोत नेमके कसे आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
नगर आहे राजकीय गणगोतांचा जिल्हा
अहमदनगरच्या संगमनेर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बहिणीचा पार्थर्डीचे भाजप नेते आप्पासाहेब राजळे यांच्याशी विवाह झाला आहे. तसेच राजळेंच्या सून मोनिका राजळे आधी राष्ट्रवादीत होत्या, पण आता त्या भाजपच्या आमदार आहेत.
म्हणजे एकमेकांचे धूर-विरोधी गटातील हे नेते एकमेकांचे सोयरे आहेत. दुसरीकडे आप्पासाहेब राजळें यांच्या कन्या यांचा विवाह ठाकरे गटाच्या शंकरराव गडाख यांच्या समवेत झाला आहे. ते नेवासा येथील ठाकरे गटातील ताकतवर नेते आहेत.
शेवगाव-पाथर्डीत देखील राजकीय गणगोत पाहायला मिळते. येथील माजी आमदार चंद्रशेखर घुले जें की सध्या अजित दादांच्या गटात आहेत त्यांचे बंधू नरेंद्र घुले शरद पवार गटात आहेत. घुलेंची एक कन्या नेवासातल्या ठाकरे गटाच्या गडाखांची सून आहे. आणि घुलेंच्या दुसऱ्या कन्या कोपरगावचे अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळेंच्या पत्नी आहेत.
तसेच, राहुरीत पण राजकीय गणगोत आहे. येथील भाजपाचे नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या एका मुलीचा विवाह अजितदादा यांच्या गटात असलेल्या संग्राम जगताप यांच्याशी झाला आहे. दुसरी मुलगी नगरच्या कोतकर घराण्यात दिली आहे जे की आधी काँग्रेसमध्ये होते. आणि तिसरी मुलगी नगरच्या गाडे परिवारात दिली आहे जे की शरद पवार यांच्या गटात आहेत.