विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : ‘नाही कोणतेही भय…निवडून येणार सुजय’.. आठवलेंनी कवितेतून गाजवली प्रचारसभा, मुस्लिमांबाबतही भाष्य

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांचे कामकाजही उत्तम आहे. परंतु त्यांच्या चाहत्यांना जास्त आवडते ते म्हणजे त्यांचे काव्य. ते त्यांच्या शीघ्र कवितेंसाठी प्रसिद्ध आहेत.

त्यांनी नगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचारार्थ बोलतानाही आपल्या काव्यातून भस्य करत सुजय विखेंचा विजय मांडला. ‘तुम्ही मनामध्ये ठेवू नका कोणतेही भय… कारण निवडून येणार आहेत सुजय…’ असे काव्य करताच समर्थकांनी टाळ्या वाजवत साद दिली.

यावेळी त्यांनी मोदी हे मुस्लिम विरोधी नसल्याचे व काँग्रेसनं शरद पवार यांना पंतप्रधान होऊ न दिल्याचा दावाही यावेळी केला. खासदार डॉ. सुजय विखे व शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मंत्री आठवले नगरला आले असता त्यांनी मीडियाशी देखील संवाद साधत अनेक राजकीय गोष्टी स्पष्ट केल्या.

यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री डॉ. राजकुमार बडोले हे देखील उपस्थित होते.

शरद पवारांना काँग्रेसने फसवले आहे
शरद पवार यांनी महायुतीमध्ये यायला पाहिजे हे माझे आताचे नव्हे तर पूर्वीपासूनचे आवाहन आहे. याचे कारण असे की, काँग्रेसने पवार यांच्यावर अन्याय केलाय. पंतप्रधानपदाची संधी असतानाही काँग्रेसने पवार यांना पंतप्रधान केले नाही तर मनमोहन सिंग यांना ती संधी दिली.

असे दोनदा केले आहे. त्यामुळे ज्यांनी पवारांना डावलले, अन्याय केला अशा काँग्रेसमध्ये त्यांनी त्यांचा पक्ष विलीन न करता महायुतीमध्ये आले पाहिजे असे मंत्री रामदास आठवले म्हणाले.

मोदी व मुस्लिम यांविषयी भाष्य
भाजप चारशे पार झाले तर संविधान बदलले जाईल व लोकशाही धोक्यात येईल असा दावा काँग्रेस करत असली तरी देशाची लोकशाही नव्हे तर काँग्रेसच धोक्यात आलेली असल्याचे आठवले म्हणाले. चारशे पारच्या नाऱ्यातून संविधान बदलणार नाही तर उलट संविधान मजबुतीकरण होणार असल्याचे आठवले म्हणाले.

काँग्रेस सध्या भेदभावाचे वातावरण निर्माण करत आहे. घटनेनुसार धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नसते परंतु काँग्रेस ओबीसीमधून मुस्लिम आरक्षण देण्याचा प्रचार करत असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी नाही तर ओबीसीमधून मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या भूमिके विरोधात असल्याचेही आठवले म्हणाले.

Ahmednagarlive24 Office