Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणूक सध्या तेथील राजकीय घडामोडींमुळे राज्यात गाजली. सध्या राज्याचे लक्ष असणाऱ्या ठराविक जागांपैकी ही एक जागा असणार आहे. याचे कारण म्हणजे लंके-विखे जोडगोळीने लावलेली ताकद. परंतु आता अहमदनगरमधील आणखी एका गोष्टीने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
अहमदनगर शहरात तब्बल २५ ठिकाणी ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा अशा आशयाचे बॅनर झळकले असल्याने चर्चांना उधाण आले आहे. या बॅनरवर मफलर घातलेल्या व्यक्तीची आकृती दिसत असून बॅनर लावणारी मंडळी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव सुचवू पाहत असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
ओबीसी महासंघाच्या दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरात २५ ठिकाणी ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. असले बॅनर आणि त्यावर असलेली भुजबळांसारखी दिसणारी आकृती त्यामुळे आता राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
भुजबळांना उमेदवारी न दिल्याने ओबीसी समाज नाराज ?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा असल्याने या बॅनर्सचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी बराच काळ चर्चेत होते.
परंतु कित्येक दिवस केवळ चर्चाच राहिल्या व अचानक त्यांनी माघार घेतली. त्यामुळे ओबीसी समाजात काहीशी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यात आता अहमदनगरमध्ये ओबीसी महासंघाच्या वतीने
दिलीप खेडकर उमेदवार असल्याने निवडणुकीत त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी संपूर्ण शहरामध्ये ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं असे बॅनर लावले असल्याचे बोलले जात आहे. आता याचे राजकीय परिणाम कशा पद्धतीने उमटतात ते आगामी काळात दिसून येणार आहे.