Ahmednagar Politics : सध्या कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांवर अवकृपा करून गेली. एकीकडे खाणाऱ्यांची सोय झाली असली तरी पिकवणाऱ्यांचा रोष मात्र वाढला आहे.
दोन्ही बाजूच्या उमेदवारांना प्रचारात रोषाचा सामना करावा लागत आहे. या रोषाचा फटका सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनाही बसत आहे. याचे कारण म्हणजे तुम्हीही सत्तेत होतात तेव्हा का नाही काही केलं असा सवाल विरोधकांनाही केला जातोय. अर्थात काय तर लोकसभेच्या प्रचारात कांदाफोडणी मिळाली आहे.
जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रचार ऐनभरात आलेला असतानाच केंद्राच्या कांदा निर्यात संबंधीच्या निर्णयामुळे या प्रचाराला कांद्याची फोडणी मिळाली आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात प्रचार टिपेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत.
राज्यात लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी या मुद्यावरून केंद्र सरकारवर ‘शेतकरी विरोधी सरकार’ म्हणून टिकेची झोड उठविली. देशभरात कांदा निर्यात बंदी असताना केंद्र सरकारने ऐन निवडणुकीत फक्त गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी देऊन महाराष्ट्रासह देशातील इतर शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे,
अशी टीका महाविकास आघाडीचे प्रमुख नेते प्रचारादरम्यान करू लागले. कांदा उत्पादक पट्ट्यातील प्रमुख जिल्हा असलेल्या नगरच्या उत्तर आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
ऑगस्टमध्ये सरकारने देशांतर्गत कांदा भाव वाढू नये म्हणून कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले होते. ऑक्टोबरमध्ये देशभरात कांद्याचे भाव झपाट्याने वाढू लागले आणि अवघ्या आठवडाभरात ते दुप्पट झाले.
त्यानंतर ग्राहकांना स्वस्त कांदा मिळावा म्हणून सरकारने २७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि इतर सरकारी विक्री केंद्रांद्वारे २५ रुपये प्रतिकिलो दराने कांद्याची विक्री सुरू केली होती.
दोन्ही बाजूच्या उमेदवारांना फटका
सध्या या रोषाचा फटका सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनाही बसत आहे. याचे कारण म्हणजे तुम्हीही सत्तेत होतात तेव्हा का नाही काही केलं असा सवाल विरोधकांनाही केला जातोय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकही अडचणीत आलेत.