विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : प्रचाराचे फक्त दोन दिवस ! विखेंसाठी लंकेंच्या विरोधात अजित दादा मैदानात, एकाच दिवसात 7 सभा, दादा-ताईंमध्येच धुराळा…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी तीन टप्प्यात मतदान झाले असून आता चौथा टप्पा जवळ आला आहे. चौथ्या टप्प्यासाठी अहमदनगर व शिर्डी हे दोन्ही मतदार संघात १३ मे ला मतदान होईल. त्यामुळे आता प्रचाराला केवळ दोन दिवस उरले असून अहमदनगर मतदार संघात विखे-लंके यांच्या प्रचाराचा धुराळा उठणार आहे.

बारामतीची निवडणूक झाल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार शेवटच्या दोन दिवसांत अहमदनगरमध्ये सक्रिय दिसतील. ते स्वतः सभा घेणार आहेत. आज व उद्या जास्तीतजास्त प्रचार करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका लावला आहे.

आज (दि.१० मे) अहमदनगर मध्ये सात सभा होणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दोन सभा होतील. त्यांच्यासोबत मंत्री रामदास आठवले, पंकजा मुंडे, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, भास्कर जाधव, भूषणसिंह होळकर आदी सभा गाजवणार आहेत.

विखेंसाठी अजित दादा तर लंकेंसाठी सुप्रियाताई..
पुतण्या रोहित पवार यांच्या मतदारसंघात शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होईल व त्यानंतर लंके यांच्या बालेकिल्ल्यात दुपारी सभा होईल. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रथमच अजित पवार आपला पुतण्या आ. रोहित पवार यांच्या मतदार संघात येतायेत.

तसेच निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांसोबत गेल्यानंतरही ते प्रथमच पारनेरमध्ये सभा घेतायेत. त्यामुळे ही सभा लक्षवेधी ठरणार आहे.

लगेचच खा.सुप्रिया सुळे मैदानात..
अजित पवारांची सभा दुपारी पारनेरमध्ये होताच ढवळपुरी येथे सुप्रिया सुळे यांची सभा होणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या अजित पवारांवर काही बोलणार का याकडे लक्ष असेल. म्हणजेच येथे दादा-ताईंमध्येच धुराळा उडालेला दिसेल.

इतरही सभा
दुपारी एक वाजता खा. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पाथर्डीत भाजप नेत्या पंकजा मुंडे तर सायंकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मंगल गेट परिसरात सभा होईल. निलेश लंके यांच्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सभा घेतील.

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे ही सभा होईल तर सायंकाळी 6:30 वाजता जयंत पाटील, भास्कर जाधव, भूषणसिंह राजे होळकर यांच्या उपस्थितीत जामखेड येथे मैदान गाजणार आहे.

अहमदनगरमधील आजच्या (दि.१०) सभा
खा. सुजय विखे –
सकाळी साडेनऊ वाजता कर्जत बाजार तळ येथे अजित पवारांची सभा त्यानंतर 11 वाजता पारनेर बाजार तळ येथे पुन्हा त्यांचीच सभा. दुपारी 1 वाजता पाथर्डी बाजार तळावर पंकजा मुंडे यांची सभा तर सायंकाळी 6 वाजता नगर शहरातील मंगल गेट येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा होईल.

निलेश लंके –
सकाळी नऊला शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव फाटा येथे जयंत पाटील यांची सभा, त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता जामखेड येथे जयंत पाटील, भास्कर जाधव, भुषणसिंह होळकर हे मैदान गाजवतील. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे सायंकाळी 6 वाजता सुप्रिया सुळे सभा घेतील.

Ahmednagarlive24 Office