विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : सुजय विखे व राधाकृष्ण विखे पाटील गुप्तपणे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या भेटीला ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुकांची मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसा राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. एकमेकांबाबत गौप्यस्फोट होऊ लागले आहेत.

आता अहमदनगरच्या राजकारणात विखे पाटील पितापुत्रांबाबतच्या एका गौप्यस्फोटाने चर्चांना उधाण आले आहे. खा. सुजय विखे व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोघांनीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची दिल्लीत भेट घेतली होती असा गौप्यस्फोट आज शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ते आपले उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यासाठी अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. या गौप्यस्फोटानंतर आता विखे-पाटील पितापुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत का अशा चर्चा सुरु झाल्यात.

आ. बाळासाहेब थोरातांवरही टीकास्त्र
आ. बाळासाहेब थोरात यांनी मध्यंतरी वंचित आघाडीवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी या सभेत थोरातांवरही घणाघात केला. ते म्हणाले, थोरातांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात काय चालले आहे ते पाहणे गरजेचे आहे.

सुजय विखे पाटील हे 28 मे 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजता तुघलक लेनमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना भेटले असल्याचा दावा त्यांनी केला. ही झालेली भेटीची घटना बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली असल्याचे मी मानत नाही असे आंबेडकर म्हणाले.

बाळासाहेबांसाठी चिंताजनक असलेली दुसरी घटना म्हणजे 9 जून 2023 रोजी दुपारी तीन वाजता खर्गे सोलापूरहून बंगळुरूला गेले होते. याआधी 8 जून 2023 रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरगे यांची गुपचूप भेट घेतली होती. त्यांनी काय चर्चा केली ते मी सांगत नाही.

पण भाजपचे लोक काँग्रेसच्या लोकांना भेट आहेत व काँग्रेसवाले गाफील असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे या घडामोडी पाहता थोरातांनी पक्षाकडे लक्ष द्यावे अन्यथा तुमच्या हातातील काँग्रेस पक्ष कधी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हातात जाईल ते सांगता येत नाही असा टोला त्यांनी लगावलाय.

 

Ahmednagarlive24 Office