महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत असून ११ मतदार संघटित निवडणूक होत आहेत. यात अहमदनगर व शिर्डी यांचाही समावेश आहे. आज सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान सकाळीच एक घटना समोर आल्याची चर्चा आहे.
भाजप उमेदवाराच्या प्रचाराचे पत्रक मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे आढळून आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. हा प्रकार पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे घडल्याचे कळते. ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेतला असल्याचीही माहिती मिळाली आहे.
मतदान केंद्रावरील अधिकारी हे सुजय विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचा आरोप ग्रामस्थांच्या केलाय. गावकऱ्यांनी याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना कळवले आहे. आज सकाळी हा प्रकार आढळून आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या विषयास तोंड फुटले
असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.दरम्यान, बाहेरच्या व्यक्तीने पत्रक टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मतदान केंद्रावरील टीम बदलण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली होती.
मतदान प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचारी घेतले होते व आदल्या दिवशी ग्रामस्थांच्या कोणत्याही तक्रारी आल्या नव्हत्या असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान सकाळी नऊ वाजेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात शांततेत मतदान सुरु होते शिर्डी, अकोला येथे ६.५, संगमनेर येथे १०.८७, शिर्डी ५.८५, कोपरगाव ५.११, श्रीरामपूर ५.१७ तर नेवासे येथे ५.०४ टक्के मतदान तर अहमदनगरमध्ये ५.१३ टक्के मतदान सकाळी ९ वाजेपर्यंत झाल्याचे पाहायला मिळाले.
मतदान प्रक्रिया सुरळीत :
तालुक्यातील घुमटवाडी येथे मतदानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पत्रक सापडल्याप्रकरणी त्या मतदान केंद्रावरील चार कर्मचारी हटवण्यात आले असून त्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती तहसीलदार उद्धव नाईक यांनी दिली आहे.