Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेचे वातावरण अत्यंत गरमागरम झाले असून प्रचार शिगेकडे पोहोचत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील काही राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते हे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे काम करत नसल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे गेली आहे.
त्यामुळे पवार यांनी नगरकडे धाव घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बैठक घेत नागवडे यांच्या समर्थकांना खडेबोल सुनावले असल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची शुक्रवारी सकाळी अंबालिका साखर कारखान्यावर बैठक घेतली.
विखे समर्थकांकडून काम करत नसल्याचा अहवाल अजित पवार यांच्याकडे गेला. त्यात श्रीगोंदा तालुक्यातील अत्यंत दिग्गज नेत्यांसह, कट्टर समर्थक, इतर २५ समर्थक भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे काम करीत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही झाडाझडती घेतली.
बैठकीत पवार यांनी कार्यकर्त्यांची यादीच वाचून दाखविली. या बैठकीला राजेंद्र नागवडे, दीपक नागवडे, अनुराधा नागवडे, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे हे उपस्थित होते असे वृत्त एका मीडियाने दिले आहे. या बैठकीत पवार म्हणाले, श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते डॉ. सुजय विखे पाटील यांचे काम करीत नाहीत, अशी माझ्याकडे यादी आली आहे.
तोंडावर एक सांगू नका आणि मागे दुसरेच करु नका. चुकीची चर्चा माझ्याकडे येऊ देऊ नका, अशा शब्दात खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार म्हणाले, ७ मे नंतर बारामतीची माझी माणसं नगर मतदार संघात येतील. त्यावेळी मला समजेल. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिलेली शब्दपूर्ती होईल. पण आता विखेंना लोकसभेत पाठविण्यासाठी तुम्ही आक्रमक व्हा. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष असलेले शरद नवले यांनाही पवार यांनी दिवसा इकडे, रात्री तिकडे असे करू नका, असे बजावले.
नागवडे, नाहाटा म्हणतात..
राजेंद्र नागवडे म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले आम्ही काम करीत नाही. निवडणूक प्रचार यंत्रणेत आम्हाला सहभागी करुन घेतले जात नाही. तरी आम्ही आमच्या पद्धतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचे काम करीत आहोत. गुरुवारी भावडी येथील हनुमानाच्या मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
सर्वांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना मदत करावी, गडबड करू नये असे या बैठकीत सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा म्हणाले, या लढाईत आम्ही गडबड करणार नाही. भाऊसाहेब नेटके म्हणाले, मी माझ्या वाडीतून विखेंना मताधिक्य देतो.