विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : निलेश लंके यांच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : माजी आ. निलेश लंके हे राष्ट्रवादीमधील बंड झाल्यानंतर अजित पवार गटात गेले व तेव्हापासूनच अनेक राजकीय गोष्टी त्यांच्या भोवती फिरत राहिल्या. त्यानंतर अजित दादा गटात असूनही शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी नेहमीच त्यांची सलगी राहिली.

ऐन लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवार गटात निलेश लंके दाखल झाले. त्यांनी पारनेरमध्ये याची घोषणा केली व आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. दरम्यान आता त्यांच्या या राजीनाम्याबाबत महत्वाची बातमी आली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी तो राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याचे विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला होता.

त्यानंतर काही महिन्यांत त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत प्रवेश करीत थेट लोकसभेची निवडणूक लढविली. तत्पूर्वी त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा विधानसभा राजीनामा अध्यक्षांकडे सोपविला होता. तो स्वीकारण्यात आला आहे.

दरम्यान काही मीडियाने आमदार नीलेश लंके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही परंतु त्यांच्या कार्यालयाशी संपर्क झाल्यानंतर एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की आमदार लंके यांच्या राजीनाम्याबाबत आमच्याकडे अद्याप तरी काहीच माहिती आली नाही.

दरम्यान आता पारनेर विधानसभेची जागा रिक्त झालेली आहे. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे आता कालावधीही कमी असल्याने या जागेवर पोट निवडणूक होणार नसल्याची माहिती समजली आहे.

लोकसभेच्या निकालाची उत्सुकता
राज्यात लक्षवेधी ठरलेली अहमदनगर लोकसभेची निवडणूक संपली. आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती निकालाची. सध्या कोण होणार अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा खासदार, याचीच चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. विशेषतः ग्रामीण भागात गावच्या कट्ट्यावर सध्या हा विषय चर्चिला जात आहे.

Ahmednagarlive24 Office