Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले आहे. राज्याच्या राजकारणात अहमदनगरमधील राजकारण महत्वपूर्ण राहिले आहे. अहमदनगरमधील सहकार, संस्थांचे जाळे आदी याला कारणीभूत राहिले.
अहमदनगरने आजवर अनेक मंत्री महाराष्ट्राला दिले. अहमदनगरच्या राजकारणातील विशेषतः उत्तरेतील महत्वपूर्ण घराणे म्हणजे आदिक घराणे. दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत. गोविंदराव आदिक हे माजी मंत्री राहिले आहेत.
राजकारणात अनेक बदल !
वरती पक्ष फोडाफोडीनंतर महायुती व महाविकास आघाडी निर्माण झाली तसतसे खालील पातळीवरील राजकारणही बदलत गेले. सध्या गोविंदराव आदिक यांचे पुत्र अविनाश व कन्या अनुराधा यांनी महायुतीच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे.
राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर अविनाश आदिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यांच्या बहीण माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक या मात्र काही काळ अलिप्त होत्या. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांपासून बाजूला राहणे त्यांनी पसंत केले होते.
मात्र, शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या बोलविलेल्या बैठकीला अनुराधा या उपस्थित राहिल्या. त्यानंतर बुधवारी श्रीरामपुरातील मुख्यमंत्र्यांच्या सभेला त्या बंधू अविनाश यांच्यासमवेत मंचावर होत्या. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याकरिता अनुराधा यांनी शहरातून फेरी काढली.
विखे व आदिक घराण्याची जवळीक
राज्याच्या राजकारणात तब्बल चार दशके आदिक कुटुंबीयांचा दबदबा राहिला. रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्रिपदावर काम करण्याची काँग्रेसकडून संधी मिळाली. त्यांचे बंधू गोविंदराव आदिक हे राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ मंत्री राहिले.
त्यांनी काँग्रेसी विचारांचेच राजकारण केले. विखे कुटुंबीय व गोविंदराव यांचे एकाच पक्षात असूनही राजकीय सख्य नव्हते. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आदिक यांना स्थान मिळालेले नव्हते. त्यांच्याऐवजी ते राधाकृष्ण विखे-पाटील यांना मिळाले.
त्यातूनच काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय गोविंदराव आदिकांनी घेतला होता. पुढील पिढीने हा संघर्ष मिटवलेला दिसत आहे. अविनाश व अनुराधा आदिक या पुढच्या पिढीने हे महायुतीत सक्रिय दिसतायेत.