Ahmednagar Politics : लोकसभेचा फिव्हर जसजसा वाढू लागला तसतशी राजकीय गणिते फिरू लागली आहेत. सध्या उभ्या असणाऱ्या उमेदवारांकडून बेरजेचे राजकारण सुरु आहे. नाराज असणाऱ्या, किंवा तटस्थ असणाऱ्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दिग्गज कामाला लागले आहेत.
आता शिर्डी मतदार संघातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. लोखंडे यांच्यासाठी कंबर कसली आहे. आता येथील राजकारणात खा. लोखंडे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे सक्रिय होणार आहेत. त्यांचे मन वळवण्यात यश आल्याचे समजते. त्यामुळे आता खा. लोखंडेंच्या गोटात समाधानाचे वातावरण आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे उद्यापासून सक्रिय होणार आहे. मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर २ तास झालेल्या चर्चेनंतर मुरकुटे यांनी महायुतीच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान एका वृत्तपत्राने याबाबत खात्रीशील माहिती छापली आहे. काल दुपारी १२ वा. श्रीरामपुरातील अशोक बँकेत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर बैठक झाली त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, डॉ. लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासावर व आतापर्यंतच्या राजकीय घडामोडीवर सविस्तर चर्चा झाली. गेल्या शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री ठीकठिकाणी त्यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्या.
संपूर्ण दिवस मुख्यमंत्र्यांनी लोखंडे यांच्यासाठी मतदारसंघात पॅचअप घडून आणण्यासाठी वेळ दिला. त्याच दिवशी माजी आमदार भानुदास मुरकुटे हेही आपल्या ज्येष्ठ संचालकांसह मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली.
त्यावेळी मुख्यमंत्री यांनी केलेल्या विनंतीचा विचार करण्याचे मुरकुटे यांनी सांगितले. मंत्री भुसे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उरलेल्या १२-१३ दिवसांच्या प्रचारात मुरकुटे आणि त्यांचे सर्व सहकारी हे लोखंडे यांच्या प्रचारात असतील अशी माहिती मिळाली आहे.
मुरकुटे घेणार मेळावा
एक-दोन दिवसात मुरकुटे हे कार्यकर्त्यांचा मेळावाही घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने प्रचार यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्याप्रमाणे आता प्रचार यंत्रणा उभारली जाईल, गावोगावी सभा, बैठका घेतल्या जातील, असे समजते.