Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. यांचे निलेश लंके यांचा विजय झाला. त्यानंतर विविध चर्चा सुरु झाल्या. जबरदस्त यंत्रणा, अनेक दशकांचे राजकारण हे सगळे पाठीशी असूनही सुजय विखे यांचा पराभव का झाला? निलेश लंके हे त्यामानाने सर्वसाम्यान असूनही त्यांचा विजय का झाला? याच्या चर्चा आता विविध ठिकाणी रंगू लागल्या आहेत.
या चर्चांमधून कानावर आलेल्या काही गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विखे यांनीच स्वतःच स्वतःचा पराभव केला. जर थोडेसे मागे जाऊन एक नजर टाकली तर लक्षात येईल की, २०१९ साली सुजय विखे निवडून आल्यानंतर त्यांनी अनेक महत्वपूर्ण कामे केली.
राज्यात महायुतीचे सरकार नव्हते तोवर विखे पाटील मतदारसंघाच्या संपर्कात होते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व राधाकृष्ण विखे जिल्ह्याचे पालकमंत्री बनले. त्यानंतर सुजय विखे यांनी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप सुरू केला. काही अधिकारीही त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू लागल्याचे चित्र होते.
निधी वाटपही विखे यांच्याच मर्जीने झाले त्यामुळे अनेक नेते विखे यांच्यावर नाराज झाले. सुजय विखेंचा संपर्क कमी झाल्यानंतर त्यांची कार्यालयीन यंत्रणाही लोकांशी फटकून वागत होती. त्यातच विखे यांनी नीलेश लंके यांची पारनेर तालुक्यात अडवणूक सुरू केली. विखे व लंके यांच्यात विसंवाद निर्माण करण्यात विखे यांचे पारनेरमधील काही समर्थकही कारणीभूत आहेत.
विखे हे लंके यांना आपले स्पर्धक मानून त्यांची अडवणूक करत होते. त्यामुळे लंके यांनी विखे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली. विखे यांनी हे भांडण एकप्रकारे अंगावर ओढून घेतले. पक्षफुटीनंतर लंके हे महायुतीत सोबत असूनही विखे-लंके यांचे जमले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायचीच असा चंग लंके यांनी बांधला होता. विखे यांनी केलेली अडवणूक हे प्रमुख कारण त्यामागे होते. इतर कुठलाही प्रस्थापित उमेदवार असता तर विखे यांनी त्याचा निभाव लागू दिला नसता,
पण लंके यांचा चेहरा सर्वसामान्य असल्यामुळे विखे यांची अडचण झाली. लंके यांनी माळी, धनगर, वंजारी या भाजपच्या व्होट बँकेत शिरकाव केला. विखेंच्या तोडीस तोड यंत्रणा उभी केली. त्यामुळे लंके यांचा विजय सुकर झाला. नगर शहराचा विचार केला तर मागील निवडणुकीत डॉ. विखे यांना या मतदारसंघाने ५३ हजारांचे लीड दिले होते.
त्यामुळे यावेळी विखे काहीसे निर्धास्त होते. त्यात पंतप्रधान मोदी यांची शहरात सभा झाली, सभेला मोठी गर्दीही झाली. दुसरीकडे लंके यांनी शहरात प्रत्येक भागात जाऊन मतदारांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या सभांना देखील मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचा फायदा लंके यांना झाल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
तसेच अहमदनगरच्या नामकरणाचा प्रमुख मुद्दा प्रचारात होता. मुस्लिम समाजबांधवांचा नामकरणास विरोध होता. त्याचा फटका विखे यांना बसला आहे. त्याचबरोबर शहर आणि परिसरात काही प्रमाणात ‘जरांगे फॅक्टर’ देखील चालला असल्याचे मतदार सांगतात.