Ahmednagar Politics : नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी ५४ लाख ६० हजार ४५३ रुपये तर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी ३१ लाख ४ हजार ६९७ रुपये खर्च प्रचारावर केला आहे. अर्थात हा खर्च दि. ८ मेपर्यंतचा असून पुढील खर्चचा हिशोब अजून निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही.
त्यात विशेष म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचा खर्च महायुतीचे उमेदवार म्हणून विखे व शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये विभागून दाखविण्यात आला असून पंतप्रधानांच्या एकाच सभेला ३९ लाख रुपये खर्च झाला आहे. निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दैनंदिन निवडणूक खर्च सादर करावा लागतो.
निवडणूक खर्चाची एकूण मर्यादा ९५ लाख रुपये आहे. ३ मे, ७ मे व ११ मे या तीन दिवशी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ घातला. उमेदवारांचा खर्च व निवडणूक यंत्रणेने टिपलेला खर्च याचा ताळमेळ तीनदा घातला.
त्यानुसार दि.११ मे रोजी सर्व २५ उमेदवारांच्या ८ मेपर्यंत केलेल्या खर्चाचा ताळमेळ घालण्यात आला.८ मेपर्यंतचे हा खर्च निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या दिवसाचा विखे यांच्या प्रचाराचा खर्च ५ लाख ३८ हजार रुपये दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांनी साध्या पद्धतीने, कोणताही जल्लोष न करता उमेदवारी अर्ज दाखल केला.
या दिवसाचा खर्च २९ हजार ९२० रुपये दाखवण्यात आला आहे. लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या नगर, श्रीगोंदा, शेवगाव व राहुरीत चार सभा झाल्या. या दिवसांचा एकूण खर्च १२ लाख ३४ हजार २२५ रुपये दाखवण्यात आला.
पवार यांची राहुरीतील सभा सर्वाधिक खर्चिक ठरली. तिचा खर्च ६ लाख २८ हजार २५० रुपये दाखवण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे दिलीप खेडकर दि. ३ व १२ रोजी ताळमेळ सादर करण्यासाठी अनुपस्थित होते. त्यांनी मुदतवाढ मागितलेली आहे
अंतिम खर्च निकालानंतर
आता सर्व अंतिम खर्च, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे, ४ जूननंतर २६ व्या दिवसापर्यंत अंतिम खर्चाचा ताळमेळ घातला जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक पुन्हा नगरमध्ये दाखल होतील. यामध्ये निवडणूक निकालाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या जल्लोषाचा खर्चही समाविष्ट केला जाईल.