Ahmednagar Politics : विखे की लंके ! थेट राजस्थानातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सट्टा मार्केटचेही लक्ष? शिर्डीत मात्र शांतशांत

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe vrs lanke

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूक सुरु झाली आणि महाराष्ट्रातील काही मतदार संघांवर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले. अनके लढती अत्यंत अटीतटीच्या असल्याने त्या जागेंबाबत अगदी पाण्याच्या ठेल्यापासून तर कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत त्याच चर्चा आहेत.

यातील एक महत्वाची लढत म्हणजे अहमदनगर लोकसभेची लढत. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे चौकाचौकात कट्या कट्ट्यावर लंके की विखे निवडून येणार यासाठी लोक पैजा देखील लावत असल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कार्यकर्ते व समर्थकामधे सध्या सोशल मीडियावर चांगलेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. दोन्ही युवक नेत्यांना जिंकून आणण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करताना दिसत आहे.

फालोडी सट्टा मार्केटचेही लक्ष?
डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची व प्रतिष्ठेची बनवली आहे. तर निलेश लंके यांनी ही निवडणूक अभी नहीं तो कभी नही असा सूर आळवत आहेत. उभा दोन्ही उमेदवारांच्या विजयावर अनेक ठिकाणी गुप्तपणे पैजादेखील लावण्यात आल्या असल्याचे समजते.

विशेष म्हणजे राजस्थानमध्ये प्रसिद्ध असलेल्या फालोडी सट्टा मार्केटमध्ये खासदार डॉ. सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या विजयावर चक्क सट्टा लावण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या अहमदनगरमध्ये रंगली आहे.

राजस्थानचे हे सट्टा मार्केट आंतरराष्ट्रीय किर्तीचे सट्टा मार्केट आहे. या मतदारसंघात कोण खासदार होणार, याकडे आख्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगरच्या तुलनेत शिर्डीत शांतता
उत्तरेतील शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचीरे तर वंचित बहुजन आघाडी कडून उत्कर्षा रुपवते यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. शिर्डी मतदार संघात अद्याप सामसुम वातावरण दिसून येत आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये आरोपांच्या फैरींवर फैरी झाडल्या जात आहेत. राज्यातल्या प्रमुख वृत्तवाहिन्यांमध्येसुद्धा मुद्यावर ‘डिबेट्स’ आयोजित केल्या जात आहेत. पण या तुलनेत शिर्डीतील वातावरण जास्त ताणलेले दिसत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe